पुढील वर्षी आयपीएल आठ संघांतच?

0
190

मुंबई, दि.२१ (पीसीबी) पुढील वर्षी आयपीएल स्पर्धा किती संघांच होणार हा भारतीय क्रिकेटमधील सर्वात गहन प्रश्नाचे उत्तर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या तीन दिवसांनी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत शोधले जाणार आहे. आता तरी या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी बीसीसीआय मध्ये दोन गट पडल्याचे चित्र आहे. आयपीएल स्पर्धा आता पुढील वर्षी दहा संघांत होणार यात शंका नाही. यामध्ये एक संघ अहमदाबादचा असणार यात शंकाच नाही. दुसऱ्या संघासाठी पुणे, कानपूर, लखनौ अशा शहरांचा विचार होऊ शकतो. पण, दुसऱ्या संघासाठी कुठल्या शहराने नाही, तर थेट एका क्रिकेट संघटनेने तयारी दर्शवली आहे आसाम क्रिकेट संघटना आगामी आयपीएलच्या मोसमात गुवाहटीच्या नावे एक संघ घेण्यास तयार आहे. आसाममधील स्थानिक दैनिकांनी हे वृत्त दिले आहे. आसाम क्रिकेट संघटनेचे सचिव देवजित लॉन सैकिया यांनी आसाम क्रिकेट संघटना संघ घेणार असल्याचे वृत्त तेथील दैनिकांनी दिले आहे.

दरम्यान, बीसीसीआयने मात्र हे वृ्त्त फेटाळले आहे. गुवाहटीचा संघ असू शकत नाही, असे बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. हा अधिकारी म्हणाला,’बीसीसीआयच्या बैठकीत आयपीएलमध्ये पुढील वर्षापासून एक किंवा दोन संघ जोडण्याचा विचार होऊ शकतो. पण, एखादा संघ कुठल्या राज्य संघटनेशी जोडलेला निश्चित नसेल. दोन संघांचा प्रवेश झालाच, तर एक अहमदाबादचा असेल, तर दुसरा संघ पुणे, लखनौ, कानपूरपैकी एक असू शकतो. गुवाहटीचा संघ नक्कीच नसेल.’

निर्णय बैठकीतच
आयपीएलमध्ये किती संघ असावेत याचा निर्णय बैठकीतच होणार आहे. अर्थात, त्यापूर्वी विविध स्तरातून मिळालेल्या माहितीनुसार काही झाले तरी एक संघ अहमदाबादचा असणार यात शंका नाही. पुणे, लखनौ, कानपूर यांचा विचार आयपीएलमध्ये एकापेक्षा अधिक संघ जोडून घ्यायचा निर्णय झाल्यासच होईल. बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली आणि सचिव जय शहा आयपीएलमध्ये दोन संघ जोडण्यासाठी कमालीचे आग्रही आहेत. पण, काही जाणकार व्यावहारिकदृष्ट्या १४व्या पर्वापासून दोन संघ नव्याने जोडणे खरच शक्य आहे का असा प्रश्न उपस्थित करत आहेत.

अडचणी काय
बीसीसीआयच्या सुत्रानुसार पुढील वर्षी होणाऱ्या नव्या मोसमात दोन संघ जोडून घेण्यासाठी हातात खूप कमी कालावधी आहे. निविदा, खेळाडूंचा लिलाव आणि सर्व भागधारकाना एवढ्या कमी वेळेत एकत्र आणणे हे आव्हानात्मक असेल. त्यामुळे आता लगेच नाही,तर २०२२ पासून आयपीएलमधील संघांची व्याप्ती वाढवण्यात यावी असा एक मतप्रवाह सध्या पुढे येत आहे.

अशी तांत्रिक अडचण
बीसीसीआयच्या दुसऱ्या गटाचे आणखी एक म्हणणे म्हणजे दोन नवे संघ आताच घेण्यात तांत्रिक अडचण आहे. ही अडचण म्हणजे आयपीएलच्या प्रसारणाचे स्टारकडे असलेले अधिकार हे २०२१ पर्यंतच आहेत. हा करार संपल्यावर जर, दोन नव्या संघांच्या समावेशाचा विचार झाल्यास प्रसारण हक्क आणि अन्य व्यावसायिक भागीदारांचे मूल्य वाढू शकते. अर्थात, हा निर्णय बीसीसीआयच्या बैठकीत होणार आहे. यानंतरही मला विचाराल तर पुढील वर्षी संघ वाढविण्याचा विचार करू नये असे वाटते, हे या अधिकाऱ्याने नाव न घेण्याच्या अटीवर सांगितले.

ही देखिल अडचण
सध्याच्या करोना संकटाच्या परिस्थितीत संघ वाढविण्याचा विचार होऊ नये असा आणखी एक अधिकारी म्हणाला. कारण, अजूनही देशातील करोना परिस्थिती सुधारलेली नाही. त्यामुळे होम आणि अवे सामने घेण्याचा प्रश्नच आहे. दहा संघ झाले म्हणजे सामने वाढले. सामन्यांची संख्या ९४ पर्यंत जाईल. सामने घेण्याचा, खेळाडूंच्या प्रवासाचा, केंद्राचा सगळाच प्रश्न मोठा होऊन बसणार आहे.

एकूणच चित्र बघता तीन दिवसांनी होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभे आयपीएलमधील संघाच्या समावेशावरून काथ्याकूट होणार हे नक्की आहे.