पिस्तूल बाळगल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा; एकाला अटक

0
587

ताथवडे, दि. २१ (पीसीबी) – बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगल्याप्रकरणी तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील एकाला पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई गुंडा विरोधी पथकाने सोमवारी (दि. 19) सायंकाळी मुंबई बेंगलोर महामार्गावर ताथवडे येथे केली.

अश्रूकांत उर्फ अशोक उत्तेकर कसबे (वय 23, रा. जीवनगर, ताथावडे), अनिरुद्ध राजू जाधव (रा. जाधववस्ती, चिंचवड), रणजीत बापू चव्हाण (रा. चिंचवड) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. त्यातील अश्रूकांत कसबे याला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत पोलीस नाईक विजय तलवार यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगले असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी मुंबई बेंगलोर महामार्गावर ताथवडे येथे मयूर लॉज जवळ सापळा लावून कारवाई केली. त्यात आरोपी अश्रूकांत याच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत काडतुस असा 40 हजार 500 रुपयांचा शस्त्रसाठा सापडला. पोलिसांनी पिस्तुल आणि काडतुस जप्त करत आरोपी अश्रुकांत याला अटक केली. त्याच्यासह त्याच्या अन्य दोन साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक माने तपास करीत आहेत.