कुस्ती : अमन, सागर कॅडेट गटातून नवे जगज्जेते

0
217

बुडापेस्ट, दि.२१ (पीसीबी) : ऑलिंपिक स्पर्धांकडे लक्ष केंद्रित असतानाच भारताच्या अमन गुलिया आणि सागर जगलान यांनी तमाम देशवासियांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. येथे सुरू असलेल्या कॅडेट गटाच्या जागितक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत त्यांनी सुवर्ण कामगिरी केली. भारताचे हे दोन नवे जगज्जेते कुस्तीगीर ठरले. पहिल्या दिवशी भारताने दोन सुवर्ण आणि एक ब्रॉंझ अशी कामगिरी केली.

अमनने ४८ किलो, तर सागरने ८० किलो वजन गटातून ही सोनेरी कामगिरी केली. वेगवान कुस्ती आणि बचावावर असलेली हुकुमत यामुळे दोघांनी निर्विवाद वर्चस्व राखले. सागरला कमी अधिक प्रमाणात आव्हान निर्माण झाले. पण, अमनने एकतर्फी लढती केल्या .

अंतिम फेरीत भारताच्या अमन याने अमेरिकेच्या जोसेफ याला गुणांवर ५-२ अशा फरकाने पराभूत केले. दोन वेळा त्याने ताबा मिळवत घेतलेले गुण आणि जोसेफला दिलेली निष्क्रियता यातून मिळालेला गुण अशा पाच गुणांची कमाई करून त्याने आपले सुवर्णपदक निश्चित केले. त्याचवेळे बचावात त्रुटी राहणार नाही आणि प्रतिस्पर्ध्याला संधी मिळेल अशी कुठलीही चुक त्याने केली नाही.

भारताच्या अमन याने उपांत्य फेरीत जॉर्जियाच्या रेझो मार्सागीश्विली याच्यावर अशी पकड मिळवली, तर उजवीकडच्या छायाचित्रात उपांत्य फेरीत सागरने जॉर्जियाच्या टोर्णिक याच्यावर अगदी अखेरच्या मनिचाला विजय मिळविला. तेव्हा त्याला आनंद लपवता आला नाही,

त्यानंतर झालेल्या ८० किलोच्या कुस्तीत सागरने अमेरिकेच्या जेम्स मोकेलर याला गुणांवर ४-० असे पराभूत करून सुवर्णपदक पटकावले. स्पर्धेतील ११० किलोपेक्षा अधिक वजन गटात साहिलने कझाकस्तानच्या अली खान याला साल्तो डावावर चितपट करून ब्रॉंझपदक मिळविले.

त्यापूर्वी, अमनने पहिल्या फेरीत हंगेरीच्या टॅलिन याला १०-०, दुसऱ्या फेरीत सर्जीसला ४-१ आणि उपांत्य फेरीत जॉर्जियाच्या रेझो याला १०-० असे पराभूत केले. सागरनेही पहिल्या फेरीत हंगेरीच्या मुसजाला याचे आव्हान १४-९ असे परतवून लावले. त्यानंतर त्याने अझरबैझानच्या साल्टर खान याला १२-४ असे हरवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. तेथे त्याला जॉर्जियच्या टोर्णिक याचा कडवा प्रतिकार झाला. निर्णायक लढत ६-६ अशी बरोबरीत सुटली. पण, नियमानुसार अखेरचे गुण सागरने घेतल्याने त्यासा विजयी जाहिर करण्यात आले.

स्पर्धेच्या पहिल्या दिवशी वैभव पाटिल ५५ किलो वजन गटात ब्रॉंझपदकाची लढत हरला. त्याला अझरबैजानच्या जाविद जावाडोवकडून ७-५ अशी हार पत्करावी लागली. साहिलने मात्र ११० किलो वजन गटात कझाकस्तानच्या अलिखान कुसाईनो याला पहिल्या दोन मिनिटातच चितपट करून ब्रॉंझपदक मिळविले.

आता दुसऱ्या दिवशी जसकरण सिंग ६० किलो वजन गटात सुवर्ण लढत खेळेल. त्याने अझरबैझानच्या अब्दुलरहेमान इब्राहिमोव याचा ६-२ असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. त्याची गाठ आता उझबेकिस्तानच्या कार्मोन्बेक काडामोव याच्याशी पडेल. त्याचवेळी चिराग (५१ किलो) आणि जयदीप (७१ किलो) हे ब्रॉंझपदकाच्या लढती खेळतील.