पिण्यासाठी वापरण्यात येणारे पाणी उकळून घ्या – महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचे आवाहन

0
487

पिंपरी, दि. १० (पीसीबी) – पिंपरी-चिंचवडमध्ये मागील काही दिवसापासून होत असलेल्या पर्जन्यवृष्टीमुळे नागरिकांना जलजन्य आजार होण्याची शक्यता आहे. जलजन्य आजार होऊ नयेत, यासाठी नागरिकांनी घ्यावयाच्या काळजी घ्यावी, असे आवाहन अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी केले आहे. त्यासाठी नागरिकांना महत्वाच्या सूचना देखील त्यांनी केल्या आहेत.

मागील काही दिवसांपासून होणाऱ्या पावसामुळे कॉलरा, अतिसार, जुलाब यासारखे जलजन्य आजार होण्याची शक्यता आहे. त्यासाठी नागरिकांनी महापालिकेच्या नळावाटे होणाऱ्या पाण्याचा वापर पिण्यासाठी करावा. बोअरवेल, शुद्धीकरण न केलेल्या विहिरीच्या पाण्याचा वापर पिण्यासाठी करू नये. शिळे किंवा उघड्यावरचे माश्या बसलेले अन्न पदार्थ खाऊ नयेत. तसेच, अन्न पदार्थ व्यवस्थित झाकून ठेवावेत. प्रत्येक नागरिकाने वैयक्तिक स्वच्छतेचे पालन करावे. नागरिकांनी घराभोवतीचा परिसर स्वच्छ ठेवावा. उलट्या-जुलाब, ताप वगैरे आजार झाल्यास वेळीच मनपाच्या नजिकच्या दवाखाना रुग्णालयात उपचार करुन घ्यावेत.

महापालिकेच्या सर्व दवाखान्यात आणि रुग्णालयात उपचाराची सोय उपलब्ध आहे. पिण्यासाठी वापरण्यात येणारे पाणी उकळून घेऊन पिण्यासाठी वापरण्यात यावे. सर्व खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनी त्यांचेकडे उपचारास आलेल्या कॉलरा, टायफॉईड, गॅस्ट्रो, डिसेंट्री, कावीळ रुग्णांची माहिती मनपाच्या नजिकच्या दवाखाना रुग्णालयास त्वरित कळवावी. जेथे लेबर कॅम्प आहे, त्या ठिकाणच्या सर्व बांधकाम व्यावसायिकांनी महापालिकेच्या नळावाटे पुरविलेले पाणी पिण्यासाठी वापरावे. जलजन्य आजार होऊ नयेत, याबाबत सर्व कामगारांना सूचना देऊन दक्षता घ्यावी.

ताप, अतिसार व जुलाब असलेल्या व्यक्तींनी कोविड आजार आहे, किंवा नाही याबाबत तपासणी करण्यासाठी नजिकच्या मनपा रुग्णालयाशी संपर्क साधावा, असेही आवाहन डॉ. साळवे यांनी केले आहे.