पिंपळे निलख येथे हातात कोयते घेऊन टिक-टॉकवर व्हिडिओ बनवणाऱ्या चौघांवर गुन्हा; दोघे अटकेत

0
646

चिंचवड, दि. १५ (पीसीबी) – टिक- टॉक अॅपवर संजय दत्त या अभिनेत्याचा ‘अरे पकडनेकी बात छोड अपुन को टच भी नहीं कर सकता’, या प्रसिद्ध डायलॉगवर हातात कोयते घेऊन व्हिडिओ तयार करणाऱ्या चौघाजणांवर सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अभिजीत संभाजी सातकर (वय २२), शंकर संजय बिरारदार (वय १८, रा. पिंपळे निलख), जीवन रानवडे आणि एका अल्पवयीन मुलावर सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवार (दि.४) पिंपळे निलख येथे चौघा आरोपींनी टिक- टॉक अॅपवर संजय दत्त या अभिनेत्याचा ‘अरे पकडनेकी बात छोड अपुन को टच भी नहीं कर सकता’, या प्रसिद्ध डायलॉगवर हातात कोयते घेऊन व्हिडिओ तयार केला होता. तसेच तो व्हिडिओ टिक- टॉक अॅपवर अपलोड देखील केला. या व्हिडिओ बाबतची माहिती पोलीस कर्मचारी पिसे यांना मिळाली. यावर त्यांनी पोलीस उपनिरीक्षक साळुंखे यांची मदत घेऊन तपासाला सुरुवात केली. तसेच या  चौघांवर आर्म्स अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी व्हिडिओतील चार जणांपैकी दोन जणांना अटक केली आहे. तर त्यांच्या एका साथीदाराचा पोलीस शोध घेत आहेत. या व्हिडिओतील चौथा मुलगा अल्पवयीन आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर शिंदे, गुन्हे पोलीस निरीक्षक रवींद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.