पिंपळे निलख येथे पूर्ववैमनस्यातून एकाला स्क्रु ड्रायवरने जबर मारहाण

0
479

चिंचवड, दि. २७ (पीसीबी) – पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन एकाला स्क्रु ड्रायवरने जबर मारहाण करुन गंभीर जखमी करण्यात आले. ही घटना मंगळवार (दि.२५) संध्यासाकाळी साडेसातच्या सुमारास भवानी स्वीट्सजवळ पिंपळे निलख येथे घडली.

महेंद्र करीया चव्हाण (वय ३०, रा. आंबेडकरनगर बुध्द विहाराजवळ, पिंपळे निलख) असे जखमी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, योगेश चौधरी (वय २२, रा. काळेवाडी, पुणे) या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी संध्यासाकाळी साडेसातच्या सुमारास जखमी महेंद्र हे ठेकेदार बन्नासिंग सोळंकी, कामगार राकेश कुमार वर्मा आणि लवकुश चव्हाण या तिघांसोबत भवानी स्वीट्जवळ उभे होते. यावेळी आरोपी योगेश तेथे आला त्याने पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन महेंद्र याला स्क्रु ड्रायव्हरने डोळ्यावर, कपाळावर आणि कानावर जबर मारहाण केली. आरोपी योगेश याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पोलीस उपनिरीक्षक सुधीर पाटील तपास करत आहेत.