पिंपळे गुरवमध्ये सिमेंटच्या गट्टूने तरुणाला जबर मारहाण; तिघांवर गुन्हा

0
1105

चिंचवड, दि. ६ (पीसीबी) – गाडीसमोरुन बाजुला होण्यास सांगितल्याच्या कारणावरुन तिघाजणांनी मिळून एका तरुणाला लाथा-बुक्क्यांनी जबर मारहाण केली. त्यानंतर सिमेंटचे गट्टू डोक्यात मारुण गंभीर जखमी केले. ही घटना शुक्रवार (दि.४) रात्री अकराच्या सुमारास पिंपळे गुरव येथील दत्तछाया सोसायटीतील, शिवनेरी कॉलनीत घडली.

संदिप दत्तात्रय देवकर (वय २७, रा. दत्तछाया सोसायटी, शिवनेरी कॉलनी, पिंपळे गुरव) असे मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, ऋषीकेश सरतापे, कुणाल सरतापे आणि रोहित सरतापे या तिघां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिेलेल्या माहितीनुसार, जखमी संदिप देवकर यांचे पिंपळे गुरव येथील दत्तछाया सोसायटीतील, शिवनेरी कॉलनीत घर आहे. शुक्रवारी ते त्यांची गाडी त्याच्या घरासमोर पार्किंग करत असताना आरोपी ऋषीकेश सरतापे हा रस्त्याच्यामध्ये उभा होता. यावर संदिप याने हॉर्न वाजवून त्याला बाजुला होण्यास सांगितले. यादरम्यान त्यांची बाचाबाची झाली आणि ऋषीकेशने संदिप याला, “तु काय इथला भाई आहेस”, का असे बोलून शिवीगाळ केली. त्यानंतर थोड्या वेळाने ऋषीकेश हा त्याचे दोन भाऊ कुणाल आणि रोहित यांना घेऊन संदिप जवळ आला. त्यांनी काही एक विचार नकरता संदिप याला लाथा-बुक्क्यांनी जबर मारहाण केली. तसेच सिमेंटचा गट्टू डोक्यात मारुण गंभीर जखमी केले. सांगवी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक चव्हाण तपास करत आहेत.