पिंपळेनिलख, साई चौकातील उड्डाणपुलाची एक लेन डिसेंबरमध्ये वाहतुकीसाठी खुली होणार – शत्रुघ्न काटे

0
662

चिंचवड, दि. १९ (पीसीबी) – सांगवी ते किवळे बीआरटीएस रस्त्यावर पिंपळेनिलख येथील साई चौकात उभारण्यात येत असलेल्या उड्डाणपुलाची एक लेन डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वाहतुकीसाठी खुली करण्यात येणार आहे, अशी माहिती पिंपळेसौदागरचे भाजप नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी सोमवारी (दि. १९) दिली.

नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता संदिप खलाटे, कन्सल्टंट राहुल जगताप,विद्युत विभागाचे विभाग कनिष्ठ अभियंता कावळे यांच्यासोबत साई चौकात उभारण्यात येत असलेल्या उड्डाणपुलाच्या कामाची पाहणी केली. त्यावेळी नगरसेवक काटे यांनी उड्डाणपुलाची एक बाजू डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वाहतुकीसाठी खुली करण्यात येणार असल्याचे सांगितले.

नगरसेवक शत्रुघ्न काटे म्हणाले, “साई चौक हा मुख्य रहदारी तसेच मोठ्या प्रमाणात वाहतूक होणार चौक आहे. वाढत्या नागरिकरणामुळे आणि वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे साई चौकातून प्रवास करणे कठिण बनले होते. या चौकात आल्यानंतर नागरिक व वाहनचालकांना सतत वाहतूककोंडीला सामोरे जावे लागत होते. त्यामुळे या चौकात उड्डाणपूल उभारण्यासाठी पाठपुरावा केला आणि प्रत्यक्षात कामालाही सुरूवात झाली. या उड्डाणपुलाचे काम प्रगतीपथावर आहे. उड्डाणपुलाच्या एका बाजूचे काम अंतिम टप्प्यात आहे. या महिनाअखेर हे काम पूर्ण होऊन डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उड्डाणपुलाची एक बाजू वाहतुकीसाठी खुली करण्याचे नियोजन आहे. हिंजवडीतील आयटी हबमुळे पिंपळेसौदागर व आसपासच्या परिसरात मोठ्या प्रमाणात स्थायिक झालेल्या नागरिकांना या उड्डाणपुलामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. वाकड, डांगे चौक, नाशिक फाटा आणि पुण्याकडे जाणे सोयीस्कर होऊन या परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.”