पिंपरी विधानसभा मतदारसंघाने दोन निष्क्रिय आमदार पाहिले; आता सीमा सावळे यांना पहिल्या महिला आमदार होण्याची संधी

0
1468

पिंपरी, दि. २७ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवडमधील तीन विधानसभा मतदारसंघांपैकी पिंपरी विधानसभा मतदारसंघ यंदा सर्वाधिक चर्चेचा मतदारसंघ ठरणार आहे. या मतदारसंघाला मागील दोन्ही वेळेस निष्क्रिय आमदार भेटल्याचा इतिहास आहे. पिंपरीला आता विकासाची दूरदृष्टी असलेल्या आमदाराची गरज आहे. शहरातील डॅशिंग महिला राजकारणी म्हणून ओळख निर्माण केलेल्या स्थायी समितीच्या माजी सभापती सीमा सावळे यांनी यंदा विधानसभेसाठी शड्डू ठोकले आहे. त्यांच्या उमेदवारीने पिंपरी मतदारसंघ शहरातील राजकारणात चर्चेचा केंद्रबिंदू बनला आहे. सीमा सावळे यांच्या चांगल्या कामांमुळे त्यांना पिंपरी मतदारसंघात विजयाची संधी असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. त्यामुळे सावळे यांच्या रूपाने पिंपरी-चिंचवडला पहिल्या महिला आमदार मिळणार का?, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

लोकसभा निवडणुकीचा धुरळा खाली बसतो, तोच विधानसभा निवडणूक अवघ्या तीन महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे शहरातील चिंचवड, भोसरी आणि पिंपरी या तीन विधानसभा मतदारसंघात इच्छुकांच्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. त्याचबरोबर पिंपरी विधानसभा मतदारसंघ हा शहराच्या राजकारणात चर्चेचा केंद्रबिंदू बनला आहे. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघातील उमेदवारीबाबत यापूर्वी कधीही चर्चा झाली नसेल, एवढी चर्चा यंदा होताना दिसत आहे. कारण स्थायी समितीच्या माजी सभापती आणि भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका सीमा सावळे यांनी यंदा पिंपरी मतदारसंघातून लढण्यासाठी पदर खोचले आहे.

राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघांची २००९ मध्ये पुनर्ररचना झाली. त्यामध्ये पिंपरी अनुसूचित जातीसाठी राखीव विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आला. २००९ मध्ये राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे हे पिंपरीचे प्रथम आमदार म्हणून निवडून आले. २०१४ मध्ये अण्णा बनसोडे यांचा निसटता पराभव झाला, तर शिवसेनेचे अॅड. गौतम चाबुकस्वार विजयी झाले. माजी आमदार बनसोडे आणि विद्यमान आमदार चाबुकस्वार यांनी पिंपरी विधानसभा मतदारसंघात काय विकासकामे केली हे मतदारांना दुर्बिण लावून शोधावे लागेल, अशी परिस्थिती आहे. शहराच्या राजकारणात सुद्धा बनसोडे आणि चाबुकस्वार यांची एखाद्या नेत्याने किंवा राजकीय पक्षाने दखल घ्यावी, अशी स्थिती कधीच निर्माण झाली नाही. बेदखल राजकारणी म्हणूनच या दोघांकडे पाहिले गेले.

शहरातील भोसरी आणि चिंचवड या दोन विधानसभा मतदारसंघांच्या तुलनेत पिंपरी विधानसभा मतदारसंघ हा विकासाच्या बाबतीत नेहमी मागासच राहिला आहे. यापूर्वीचे दोन्ही आमदार हे केवळ नावालाच आमदार होते. दोघेही त्यांच्या पक्षाच्या नेत्यांच्या ताटाखालचे मांजर होते. पिंपरी मतदारसंघात एखादा मोठा प्रकल्प व्हावा. तसेच या मतदारसंघात विकासकामांचा डोंगर उभारण्यात यावा यासाठी आजी आणि माजी आमदारापैकी एकाने सुद्धा तोंड उघडल्याचे मतदारसंघातील जनतेने कधी पाहिलेले नाही. आता काळासोबत राजकीय परिस्थितीही बदलत आहे. अशा परिस्थितीत पिंपरी मतदारसंघाला विकासाची दृष्टी असणाऱ्या आमदाराची गरज आहे. स्वतःचे राजकीय अस्तित्व असणारा आमदारच पिंपरी मतदारसंघाचा विकास करू शकणार आहे. त्यामुळे भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका सीमा सावळे यांना पिंपरी विधानसभा मतदारसंघातून आमदार होण्याची संधी असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.

महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता असताना महिला असूनही सीमा सावळे यांनी भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे पुराव्यासह बाहेर काढण्याचे धाडस केले. त्यामुळे भाजपला महापालिकेत सत्ता स्थापन करणे सोपे गेले. सत्ता आल्यानंतर सीमा सावळे यांना पहिल्याच वर्षी स्थायी समितीचे सभापतीपद मिळाले. या संधीचे सोने करत सावळे यांनी समाविष्ट गावांत विकासाचे “सुपरफास्ट एक्स्प्रेस” पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण काम केले. प्रचंड अभ्यास आणि कष्टाच्या जोरावर सीमा सावळे यांनी महापालिकेच्या इतिहासात आजपर्यंत एकाही स्थायी समिती सभापतीला जमले नाही, एवढा विकासाचा डोंगर उभा करण्याचे काम केले. स्थायी समिती सभापतीपदावर असताना त्यांनी तीन हजार कोटींहून अधिक विकासकामांना मंजुरी देत भाजपने दाखवलेला विश्वास सार्थ ठरविला.

आता त्या पिंपरी विधानसभा मतदारसंघातून आमदार होण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. त्यासाठी त्यांनी संपूर्ण मतदारसंघात गाठीभेटींना सुरूवात केली आहे. तसेच कार्यकर्त्यांच्यामार्फत मोर्चेबांधणीही सुरू आहे. विधानसभेसाठी भाजप-शिवसेना युतीचे अद्याप जागा वाटप निश्चित झालेले नाही. या मतदारसंघात शिवसेनेचे अॅड. गौतम चाबुकस्वार हे विद्यमान आमदार आहेत. हा मतदारसंघ युतीमध्ये कोणाच्या वाट्याला जाईल, याची वाट न पाहता सीमा सावळे यांनी आमदारकीच्या लढाईत मैदान मारण्यासाठी पदर खोचून तयारी सुरू केली आहे. त्यांच्या संभाव्य उमेदवारीने मित्रपक्ष शिवसेनेसह विरोधी पक्षाच्या इच्छुकांच्या ऊरात धडकी भरली आहे. युतीच्या जागा वाटपात पिंपरी मतदारसंघ शिवसेनेलाच मिळाल्यास सीमा सावळे या धनुष्यबाणाच्या चिन्हावर निवडणूक लढवतील, असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे. अन्यथा त्या आपला मार्ग निवडतील, असेही राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. त्यामुळे सावळे कोणत्या राजकीय पक्षाकडून पिंपरीची लढाई लढणार तसेच त्यांच्या रूपाने पिंपरी-चिंचवडला पहिल्या महिला आमदार मिळणार का?, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.