पिंपरी विधानसभा मतदारसंघ कोणाला मिळणार?; भाजप, शिवसेना की रिपब्लिकन पक्षाला

0
890

पिंपरी, दि. ४ (पीसीबी) – आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना या दोन्ही मित्रपक्षांचा पिंपरी विधानसभा मतदारसंघावर डोळा असणार आहे. हा मतदारसंघ आपल्यालाच मिळावा यासाठी दोन्ही पक्ष आग्रही राहण्याची शक्यता आहे. या मतदारसंघात आमदार शिवसेनेचा आणि वर्चस्व भाजपचे अशी राजकीय स्थिती आहे. दुसरीकडे या मतदारसंघावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा रिपब्लिकन पक्षही दावा ठोकणार आहे. परंतु, रिपब्लिकन पक्षाकडे पिंपरी मतदारसंघात निवडून येणारा उमेदवार आहे का?, हा मोठा राजकीय प्रश्न आहे. त्यामुळे राजकीय वाटाघाटीत हा मतदारसंघ भाजप, शिवसेना की रिपब्लिकन पक्षाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये तीन विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यातील पिंपरी हा विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी (एससी) राखीव आहे. २००९ मध्ये भाजप-शिवसेना युतीच्या जागा वाटपात पिंपरी विधानसभा मतदारसंघ भाजपला मिळाला होता. त्यावेळी अमर साबळे यांनी भाजपकडून निवडणूक लढविली. परंतु, राष्ट्रवादीच्या अण्णा बनसोडे यांनी साबळे यांना चितपट केले. साबळे हे शहराबाहेरचे असल्याने त्यांना पिंपरी मतदारसंघातील मतदारांनी नाकारले. परंतु, निवडणुकीनंतर साबळे हे शहरातच स्थायिक झाले आणि केंद्रात भाजपची सत्ता आल्यानंतर पक्षाने त्यांना राज्यसभेवर खासदार केले.

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना यांच्यात काडीमोड झाला. भाजप-शिवसेना युतीत सामील झालेले रामदास आठवले भाजपच्या बाजूने राहिले. त्यामुळे २०१४ च्या निवडणुकीत भाजपने पिंपरी विधानसभा मतदारसंघ रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षासाठी सोडला. आठवले यांनी पक्षाच्या ज्येष्ठ नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे यांना पिंपरी मतदारसंघातून तिकीट दिले. त्यावेळी मोदी लाट असल्याने भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सोनकांबळे यांचा जोरदार प्रचार केला. या मतदारसंघात शिवसेना प्रथमच स्वतंत्रपणे लढली. राष्ट्रवादीकडून माजी आमदार अण्णा बनसोडे पिंपरी मतदारसंघातून दुसऱ्यांदा लढले.

या तिरंगी लढतीत शिवसेनेच्या गौतम चाबुकस्वार यांना लॉटरी लागली. रिपब्लिकन पक्षाच्या चंद्रकांता सोनकांबळे यांचा अगदी कमी मताने पराभव झाला आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेची युती झाली. मतदानही झाले आणि आता सर्वजण निकालाची वाट पाहत आहेत. निकाल लागेल तो लागेल. आता सर्वांचे लक्ष विधानसभेच्या निवडणुकीकडे लागले आहे. भाजप आणि शिवसेनेने आगामी विधानसभा निवडणुकीतही एकत्र लढणार असल्याचे आधीच जाहीर केले आहे. त्यामुळे शिवसेनेचा आमदार असलेला पिंपरी विधानसभा मतदारसंघ युतीच्या जागा वाटपात कोणाच्या वाट्याला जाणार याबाबत उत्सुकता आहे.

राखीव असलेल्या या मतदारसंघात भाजप आणि शिवसेना या दोघांचाही डोळा आहे. शिवसेनेचा विद्यमान आमदार असल्याने हा मतदारसंघ आपल्याकडे ठेवण्याचा शिवसेनेचा डाव असणार यात शंका नाही. परंतु, लोकसभा निवडणुकीत मावळ आणि शिरूर या दोन मतदारसंघांपैकी एकही मतदारसंघ न मिळाल्याने भाजप पिंपरी विधानसभा मतदारसंघावरही दावा करण्याची शक्यता आहे. त्यातच पिंपरी मतदारसंघात शिवसेनेची ताकद किती हाही प्रश्नच आहे. भाजप आणि राष्ट्रवादीचे वर्चस्व असलेल्या पिंपरी मतदारसंघात शिवसेनेला विजय मिळणे खूप कठिण आहे.

त्याचप्रमाणे युतीचा घटक पक्ष असलेला रामदास आठवले यांचा रिपब्लिकन पक्षही पिंपरी मतदारसंघावर दावा करणार आहे. लोकसभा निवडणुकीत एकही जागा न मिळाल्याने रिपब्लिकन पक्ष भाजप-शिवसेनेवर आधीच नाराज आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेकडून रिपब्लिकन पक्षाची नाराजी दूर केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळेच रिपब्लिकन पक्ष पिंपरी मतदारसंघासाठी आग्रही राहणार हे निश्चित आहे. परंतु, रिपब्लिकन पक्षाकडून विधानसभा लढण्याची ताकद ठेवणाऱ्या नेत्या चंद्रकांता सोनकांबळे यांचा महापालिका निवडणुकीत पराभव झाला आहे. परिणामी रिपब्लिकन पक्षाकडे पिंपरी मतदारसंघात निवडून येणारा उमेदवार आहे का?, हा मोठा राजकीय प्रश्न आहे. त्यामुळे युतीच्या राजकीय वाटाघाटीत हा मतदारसंघ भाजप, शिवसेना की रिपब्लिकन पक्षाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.