पिंपरी महापालिकेने कामगार कल्याण मंडळाचे भूखंड न दिल्यास मगर स्टेडीयमचा ताबा घेऊ – भारती चव्हाण

718

पिंपरी, दि. १९ (पीसीबी) –  महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ आणि पिंपरी चिंचवड महापालिका यांच्यात १९९२ मध्ये झालेल्या करारानुसार नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडियम ही कामगार कल्याण मंडळाच्या मालकीची सुसज्ज वास्तू पिंपरी चिंचवड महापालिकेला हस्तांतरित केली आहे. त्या मोबदल्यात मनपाने पाच कोटी रुपये आणि पाच भूखंड कामगार कल्याण मंडळास देण्याचे ठरले होते. गेल्या २५ वर्षात त्यातील एक कोटी रुपये आणि फक्त एका ठिकाणी भूखंड कामगार कल्याण मंडळास देण्यात आले आहे. आता उर्वरित ४ कोटी रुपये २५ वर्षांच्या व्याजासह आणि चार भूखंड मंडळाला त्वरित न दिल्यास अण्णासाहेब मगर स्टेडियमचा ताबा घेण्याचा इशारा राज्य कामगार कल्याण मंडळाच्या माजी सदस्या भारती चव्हाण यांनी शुक्रवारी (दि. १९) पत्रकार परिषदेत दिला.

यावेळी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष बबन झिंझुर्डे, कार्याध्यक्ष मुकुंद वाखारे, रामकृष्ण राणे, मोहन गायकवाड, पंकज पाटील, माणिनी फौंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

भारती चव्हाण म्हणाल्या, “कामगार कल्याण मंडळ आणि महापालिका यांच्यात २००५ मध्ये करार झाला आहे. त्यानुसार कामगार कल्याण मडंळाच्या मालकीची असलेली नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडीयमची २८ एकर जागा महापालिकेला हस्तांतरीत करण्याचे ठरले. त्यामोबदल्यात महापालिकेने कामगा कल्याण मंडळाला शहराच्या इतर भागातील ५ भूखंड आणि ५ कोटी रुपये रक्कम देण्याचे ठरवण्यात आले. महापालिकेने कामगार कल्याण मंडळाच्या मालकीची मगर स्टेडीयमची जागा ताब्यात घेतली. परंतु, गेल्या २५ वर्षांत कामगार कल्याण मंडळाला अवघे १ कोटी रुपये आणि चिंचवड येथील सर्व्हे क्रमांक १९५ मधील २० हजार चौरस फूट जागा महापालिकेने दिली आहे. उर्वरित ४ कोटी रुपये आणि चार भूखंड अद्याप महापालिकेने कामगार कल्याण मंडळाला दिलेले नाहीत. यातील दोन जागा प्राधिकरणाकडून ताब्यात घेऊन महापालिका कामगार कल्याण मंडळाला देणार होते. महापालिकेने प्राधिकरणाकडून जागा ताब्यात घेण्याची कार्यवाही केली. परंतु, या जागा मंडळाला अद्याप दिलेल्या नाहीत.

कामगार कल्याण मंडळाने अनेक वर्षे पाठपुरावा केल्यानंतर मोशी, सर्व्हे क्रमांक ५ येथील दोन एकर, सेक्टर क्रमांक २५, प्लॉट क्रमांक २९० मधील २५००० हजार चौरस फूट,  सेक्टर २६ जलतरण तलावाजवळ दोन एकर, थेरगाव सर्व्हे क्रमांक ९ मधील दीड एकर आणि चिंचवड सर्व्हे क्रमांक १९५ मधील २० हजार चौरस फूट असे पाच भूखंड हस्तांतरित करण्याचे महापालिकेने ठरवले होते. परंतु, त्यावर आजपर्यंत अंमलबजावणी होत नाही. हे भूखंड घेण्यासाठी वारंवार पाठपुरावा करूनही अंमलबजावणी होत नसल्याने मगारांचा संयम आता संपला आहे. हे भूखंड त्वरित कामगार कल्याण मंडळाच्या ताब्यात न दिल्यास शहरातील कामगार नेहरूनगर येथील अण्णासाहेब मंगर स्टेडियमचा ताबा घेतील, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.”