पिंपरी महापालिकेच्या करसंवादमध्ये 250 नागरिकांचा सहभाग

0
191

पिंपरी दि. २४ (पीसीबी) – कर पावतीत किती कर आकारले जातात, कर पावतीमधील शिक्षण कर आणि शिक्षण कर फी यामधील फरक काय? कोरोना काळातील कर माफ आहे का? सदनिकांचे हस्तांतरण कसे करावे यासह मालमत्ता धारकांच्या विविध प्रश्‍नांच्या शंकाचे निरसन आज (शनिवारी) झालेल्या करसंवादमध्ये कर आकारणी व कर संकलन विभागाच्या अधिकाऱ्यांनी केले. दुसऱ्या करसंवादला मालमत्ता धारकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याची माहिती सहाय्यक आयुक्त निलेश देशमुख यांनी दिली.

पिंपरी-चिंचवड शहरात 5 लाख 79 हजार मिळकतींची नोंदणी आहे. या सर्व मिळकतींना महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागामार्फत कर गोळा केला जातो. करदात्यांचे विविध प्रश्‍न, त्यांना करासंदर्भात येणाऱ्या अडचणी, मनातील शंकांची सोडवणूक करण्यासाठी जनसंवाद सभेच्या धर्तीवर ऑनलाइन पध्दतीने ‘करसंवाद’चे आयोजन करण्यास सुरूवात करण्यात आली आहे. त्यानुसार दुसरा करसंवाद शनिवार (दि.24) सकाळी 11.30 वाजता फेसबुक, युट्यूबच्या माध्यमातून पार पडला. करसंवादला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

करसंवादमध्ये सहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख यांच्यासह प्रशासन अधिकारी नाना मोरे, श्रीकांत कोळप, राजाराम सरगर, कार्यालयीन अधिक्षक चंद्रकांत विरणक, सर्व मंडलाधिकारी उपस्थित उपस्थित होते. या करसंवादमध्ये 250 पेक्षा जास्त नागरिकांनी सहभाग घेतला. 40 नागरिकांनी ऑनलाइन प्रश्‍न विचारले. तर 4 मालमत्ताधारक प्रत्यक्षात महापालिकेत येऊन ऑफलाइन सहभागी झाले होते.

मालमत्ता धारकांनी व्यक्तीगत मिळकतीसंदर्भात आणि कायदेशीर प्रश्‍नही विचारले. या सर्व प्रश्‍नांची समर्पक उत्तरे देऊन मालमत्ता धारकांच्या शंकाचे निरंसन करण्यात आले. मालमत्ता धारकांना जलद सेवा देण्यासाठी करसंकलन विभाग सातत्याने नवनवीन प्रयोग राबवत आहे. शहरातील मालमत्ता धारकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून ऑक्टोबर महिन्यामधील चौथ्या शनिवारी तिसरा करसंवाद होणार आहे, असे सहाय्यक आयुक्त
निलेश देशमुख यांनी सांगितले.