पिंपरी महापालिकेचे अज्ञानी विरोधी पक्षनेते दत्ता साने बोले तो डबल ढोलकी; विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह

0
1692

पिंपरी, दि. २७ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी अज्ञानी ठरवलेले विरोधी पक्षनेते दत्ता साने सवंग प्रसिद्धी मिळवण्यासाठी दुटप्पी वागत असल्याचे स्पष्ट झाले आहे. महापालिकेचे वायसीएम रुग्णालय आणि निगडी, सेक्टर क्रमांक २३ येथील जलशुद्धीकरण केंद्राच्या ठिकाणी एका कंपनीममार्फत सौरऊर्जा प्रकल्प उभारून त्याद्वारे निर्माण होणारी वीज महापालिकेने २५ वर्षे खरेदी करण्याच्या प्रस्तावावरून दत्ता साने यांची ही डबल ढोलकी समोर आली आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत या प्रकल्पाला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली आहे. दत्ता साने हे या संचालक मंडळापैकी एक आहेत. त्याच दत्ता साने यांनी या प्रकल्पाच्या प्रस्तावाला गुरूवारी (दि. २७) झालेल्या सर्वसाधारण सभेत विरोध केला. त्यामुळे डबल ढोलकी वाजविणारे अज्ञानी दत्ता साने आणि त्यांच्या पक्षाच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

महापालिकेचे विरोधी पक्षनेते दत्ता साने म्हणजे अभ्यास कमी आणि आरडाओरड जास्त असे समीकरण तयार झाले आहे. साने यांनी रोज प्रसिद्धीपत्रके काढून केवळ प्रसिद्धी मिळवणे एवढाच कार्यक्रम राबवण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमधील प्रसिद्धीमाध्यमांनी दत्ता साने हे सत्ताधारी भाजपला खिंडीत गाठत असल्याचा राजकीय आभास निर्माण केला आहे. एवढेच नाही, तर आपणच महापालिका चालवितो, या आविर्भावात वागणाऱ्या काही दोन-चार खंडणीखोर पत्रकारांच्या गराड्यात वावरणारे दत्ता साने ते सांगतील, तेच करण्याचा प्रयत्न करत असल्याचेही चित्र आहे. त्याचा परिणाम म्हणजे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांना अज्ञानी ठरविले. अज्ञानीपणाचा हा शिक्का आणखी गडद होईल, असेच वर्तन सध्या दत्ता साने यांच्याकडून सुरू आहे. आता अज्ञानीपणासोबतच दत्ता साने यांचे दुटप्पी वागणेही समोर आले आहे. त्यासाठी सौरऊर्जा खरेदीचा प्रस्ताव निमित्त ठरले आहे.

महापालिकेचा केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेत समावेश आहे. एसपीव्ही ही खासगी कंपनी स्थापन करून त्यामार्फत स्मार्ट सिटी योजना राबवण्यात येत आहे. त्यासाठी या कंपनीचे संचालक निश्चित झाले आहेत. संचालक मंडळामध्ये राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांसोबतच महापालिका आयुक्त, महापौर, स्थायी समिती अध्यक्ष, सत्तारूढ पक्षनेते, विरोधी पक्षनेते आणि विरोधी पक्षाच्या दोन नगरसेवकांचा समावेश आहे. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत येणाऱ्या सर्व प्रकल्पांना या संचालक मंडळ बैठकीत मंजुरी देऊन, त्यानंतर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेची मंजुरी घेतली जाते. महापालिकेने स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत वायसीएम रुग्णालय आणि निगडी, सेक्टर क्रमांक २३ मधील जलशुद्धीकरण केंद्राच्या परिसरात एका खासगी कंपनीमार्फत सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पातून निर्माण होणारी वीज महापालिका ३ रुपये ६२ पैसे प्रती युनिट या दराने पुढील २५ वर्षे खरेदी करणार आहे.

या प्रकल्पाला स्मार्ट सिटी संचालक मंडळाच्या बैठकीत सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. त्यानंतर त्याबाबतचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेपुढे अंतिम मान्यतेसाठी ठेवण्यात आला होता. गुरूवारी (दि. २७) सर्वसाधारण सभा झाली. या सभेत विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी सौरऊर्जा निर्मितीच्या या प्रकल्पाला कडाडून विरोध केला. आमचा विरोध नोंदवूनच प्रस्तावाला मंजुरी देण्यास त्यांनी सांगितले. त्याच दत्ता साने यांनी स्मार्ट सिटी संचालक मंडळाच्या बैठकीत याच प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे दत्ता साने यांची ही डबल ढोलकी महापालिकेत चर्चेचा विषय झाला आहे. अज्ञानी दत्ता साने यांना कोणता “खुराक” मिळाला की स्मार्ट सिटी संचालक मंडळाच्या बैठकीत प्रस्तावाच्या बाजूने राहिले आणि सर्वसाधारण सभेत प्रस्तावाला विरोध केला?, हे डबल ढोलकीचे राजकारण करून कोणाला मूर्ख बनविण्याचा प्रयत्न करत आहात?, असा सवाल चिखलीतील नागरिकांकडून केला जात आहे.