पिंपरी-चिंचवड शहर भाजपकडून श्रीराम मंदिर निर्माणाचा अनोखा आनंदोत्सव; श्रीरामाची प्रतिमा देऊन ५०० कारसेवकांचा केला गौरव

0
327

पिंपरी, दि. 6 (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहर भाजपने अयोध्येत श्रीराम मंदिराचे भूमीपूजन झाल्याचा आनंदोत्सव बुधवारी (दि. ५) अनोख्या पद्धतीने साजरा केला. श्रीराम मंदिर निर्माणासाठी १९९२ मध्ये अयोध्येकडे कूच केलेल्या पिंपरी-चिंचवडमधील कारसेवकांना गुलाब पुष्प, प्रभू रामचंद्र आणि मंदिराची प्रतिमा भेट देऊन प्रत्येकाच्या घरी जाऊन गौरविण्यात आले. पहिल्या दिवशी २५ कारसेवकांचा त्यांच्या निवासस्थानी जाऊन गौरव करण्यात आला. कारसेवेतील त्या आठवणींना यावेळी उजाळा देण्यात आला. राम मंदिराचे बांधकाम अखेर सुरू झाले याचे खूप मोठे समाधान आणि आनंद सर्वांनी व्यक्त केला.

भाजपचे शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे, लक्ष्मण जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती. संघाचे प्रांत कार्यकारणी सदस्य विनायकराव थोरात, धर्मजागर विभागाचे प्रश्चिम महीराष्ट्र प्रमुख हेमंत हरहरे, हुतात्मा चापेकर स्मारक समितीचे कार्यवाह सतिश गोरडे, प्रशांत हरहरे, विनय काणे, संजय भंडारी तसेच महापालिकेतील स्विकृत नगरसदस्य मोरेश्वर शेडगे, युवा मोर्चाचे अनुप मोरे, भाजपचे शहर सरचिटणीस अमोल थोरात आदी उपस्थित होते.