पिंपरी चिंचवड शहरात सर्रास गावठी कट्ट्यांचा व्यापार 

0
327

– पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश आता करणार स्टिंग ऑपरेशन, रॅकेट उखडून फेकण्यासाठी विशेष पथकाला ‘फ्री हॅन्ड’

पिंपरी, दि. १२ (पीसीबी) – पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश आता पुन्हा नव्या दमाने हात धुवून गुन्हेगारांच्या मागे लागले आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये घडत असलेल्या गुन्ह्यांमध्ये गावठी कट्ट्यांचा वापर होत असल्याचे समोर आले. ओठावर मिसरूड न फुटलेल्या कोवळ्या पोरांना देखील कट्टे सहज उपलब्ध होत आहेत. त्यामुळे शहरात कट्ट्यांचा व्यापार होत असल्याचे अधोरेखित झाले आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी एका विशेष पथकाची स्थापना केली आहे. कट्ट्यांचे रॅकेट मुळासकट उखडून फेकण्यासाठी या पथकाला ‘फ्री हॅन्ड’ दिल्याची माहिती आहे. दोन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या महापालिका निवडणुकिच्या पार्श्वभूमिवर पोलिस आयुक्तांची ही कारवाई महत्वाची समजली जाते.

पिंपळे गुरव येथे नुकतेच एका सराईत गुन्हेगाराचा गोळ्या झाडून खून करण्यात आला. आरोपींनी दत्त जयंतीच्या कार्यक्रमात भर वर्दळीच्या ठिकाणी हे कांड केल्यानंतर भररस्त्यात एका महिलेवर बंदूक ताणली. त्यांनतर महिलेची दुचाकी हिसकावून आरोपी मोठ्या थाटात तेथून निघून केले. यातील विशेष बाब म्हणजे त्यानंतर आरोपींनी सोशल मीडियावर हातात पिस्तुल घेऊन व्हिडीओ व्हायरल केले. त्यानंतर आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर देखील त्यांनी फायरिंग केली. या झटापटीत दस्तुरखुद्द पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश देखील जखमी झाल्याचे जाहीर करण्यात आले. त्यामुळे उद्योगनगरी अशी ओळख असलेल्या पिंपरी- चिंचवड शहराची बिहारच्या दिशेने वाटचाल होऊ लागल्याच्या खोचक टीका नेटकऱ्यांकडून होऊ लागल्या. 

ही घटना ताजी असताना चाकण येथे एक पैलवान तरुणावर अंधाधुंद गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. हा व्हिडीओ पाहताना शहरवासीयांच्या अंगावर काटा उभा राहिला. दरम्यानच्या काळात तळेगाव, चिंचवड येथे देखील खुनाच्या घटना घडल्या. एकंदरीतच लागोपाठ घडलेल्या या घटनांमुळे नागरिकांमध्ये दाहशतीचे वातावरण तयार झाले आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दोन पेक्षा जास्त गुन्हे असलेल्या गुन्हेगारांची कुंडली काढण्याचे आदेश दिले. त्यानुसार, एक हजार ५५८ गुन्हेगारांची झाडाझडती घेण्यात आली. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. तसेच, आता शस्त्र विरोधी पथकाची देखील स्थापना करण्यात आली आहे.

गुन्हे शाखेतील अन्य युनिटच्या तुलनेत युनिट चारचे सहायक निरीक्षक अंबरीश देशमुख यांनी आतापर्यंत सर्वाधिक पिस्तुल जप्त केले आहेत. त्यामुळे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी अंबरीश देशमुख यांच्यावर शहरातील कट्ट्यांचा व्यापार उधळून लावण्याची जबाबदारी दिली आहे. या पथकासाठी खबऱ्यांचे जाळे असलेल्या कर्मचाऱ्यांची निवड केली जाणार आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील पिंजण यांच्या मार्गदर्शनाखाली हे पथक काम करणार असून पथकाला फ्री हॅन्ड दिल्याची माहिती आहे.  

अवैध पिस्तुल वापरणाऱ्या गुंडांची मुस्कटदाबी करण्यासाठी या विशेष पथकाची निर्मिती करण्यात आली आहे. गोपनीय माहितीच्या आधारे रॅकेटच्या मुळाशी जाऊन ते उखडून टाकण्यासाठी पथक प्रयत्नशील राहणार आहे. ज्यामुळे गंभीर गुन्ह्यांना प्रतिबंध होणे शक्य होईल, असे कृष्ण प्रकाश यांनी सांगितले.