पिंपरी चिंचवड शहरात काँग्रेसचे विसर्जन का झाले ? – थर्ड आय – अविनाश चिलेकर

0
363

गल्ली ते दिल्ली म्हणजेच देशात, राज्यात, जिल्ह्यात, शहरात आणि प्रत्येक गावात केवळ लोकशाहीच्या भल्यासाठी काँग्रेस तगली पाहिजे. भाजपाला पर्याय म्हणून एक राष्ट्रीय पक्ष हवा आहे. म्हातारी काँग्रेस आज त्यासाठीच एक गरज वाटते. कारणे अनेक आहेत, पण म्हातारी जगली पाहिजे. भाजपाचा वाटचाल आणि मोदी-शहा जोडगोळीची एकाधिकारशाही वाढतेच आहे. त्यावर कुठेतरी एक अंकूश पाहिजे आहे. आज घडीला लोकशाहीतील एका प्रबळ विरोधकाची कमी जाणवते, विरोधक दिसतच नाहीत. “काँग्रेसचे पूर्ण विसर्जन“, हा भलेही भाजपाचा संकल्प असेल, पण तसे होऊ नये. प्रादेशिक पक्षांच्या कुबड्या घेऊन तिसरी आघाडीचे आजवर अनेक प्रयोग झाले. कधी ते यशस्वी ठरले तर कधी त्याचा बोऱ्या वाजला. उजवे आणि डावे वैचारीक संघर्षसुध्दा जीवंतपणाचे लक्षण आहे, पण आता तेसुध्दा संपले की काय अशी शंका येते. लोकांना योग्य पर्याय दिसत नाही म्हणून प्रादेशिक पक्षांची चलती आहे. काँग्रेसने गांधी कुटुंबाची चाकरी सोडून आता नवा चेहरा दिला पाहिजे. अन्यथा दहा वर्षांनी नव्हे तर पुढच्या पाच वर्षांत आज जी धुगधुगी शिल्लक आहे तीसुध्दा संपेल.

कपिल सिब्बल यांचे खडे बोल –
बिहार निवडणुकितील वाताहत आणि देशभरातील पोट निवडणुकांत डिपॉझिट गेलेल्या काँग्रेसची व्यथा जेष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी मांडली. काही दिवसांपूर्वीच कपिल सिब्बल यांच्यासह काँग्रेसच्या २२ ज्येष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली होती. यामधून राहुल गांधी काही शिकले तर ठिक नाहीतर दिवस भरलेच म्हणून समजा. सिब्बल म्हणतात, लोकांना आमच्याकडून अपेक्षा उरलेल्या नाहीत. बिहारच नाही तर देशात ज्या ठिकाणी पोटनिवडणुका झाल्या तेथील जनतेने काँग्रेसला नाकारले. गुजरातच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसला एकाही जागेवर विजय मिळालेला नाही. तीन ठिकाणी उमेदवारांचे डिपॉझिटही जप्त झाले आहे. लोकसभा निवडणुकीत गुजरातमध्येही हेच घडले होते. तर उत्तर प्रदेशच्या पोटनिवडणुकीतही काही ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवारांना दोन टक्के मतं मिळाली आहेत. त्यामुळे जनमताचा संदेश स्पष्ट आहे की त्यांनी आपल्याला नाकारले आहे. बिहारमधील पराभवाचे काँग्रेसच्या पक्ष नेतृत्वाला फारसे गांभीर्य नाही. या पराभवानंतर पक्ष नेतृत्वाकडून कोणत्याही प्रकारचा संवाद साधण्यात आल्याचे कानावर आलेले नाही. कदाचित सगळं काही सुरळीत आहे आणि बिहारचा पराभव ही सामान्य बाब आहे असे पक्ष नेतृत्वाला वाटत असावे. पक्षाची मोठी घसरण होते आहे ही बाबत काँग्रेसने सर्वात आधी स्वीकारायला हवी. आपलं कुठे चुकतं आहे? हे काँग्रेसला चांगलेच ठाऊक आहे. मात्र त्याबाबत कोणीही काहीही बोलायला तयार नाही. हे असेच सुरु राहिले तर भविष्यात काँग्रेसचा आलेख आणखी खाली घसरत राहिल अशीही भीती कपिल सिब्बल यांनी व्यक्त केली. बिहार निवडणुकित राहुल गांधी चक्क सहलिसाठी जातात यातच सर्व काही आले. जे दिल्लीत तेच आज शहर आणि गाव खेड्यात दिसते आहे. काँग्रेसचे विसर्जन भाजपकडून नाही तर काँग्रेसच्याच नेत्यांकडून होईल, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

पिंपरी चिंचवड मध्ये मोठा शून्य –
पिंपरी चिंचवड शहर हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. शिवसेना, भाजप हे एकदम फुटकळ होते. भाजपचे दोन-चार नगरसेवक कसेबसे निवडून येत, तर शिवसेनेचे सहा-सात असतं. शरद पवार यांनी विदेशीच्या मुद्यावर काँग्रेस सोडली आणि राष्ट्रवादीची स्थापना केली, तेव्हापासून शहरात काँग्रेसला ग्रहण लागले. वीस वर्षांत अगदी होत्याचे नव्हते झाले. राष्ट्रवादी काँग्रेसने म्हातारी काँग्रेस गिळंकृत केली, अक्षरशः पचवली. जिथे काँग्रेसच्या मतांचा टक्का ३०-४० टक्के असायचा तिथे आज तो ३-४ टक्क्यांपर्यंत खाली आला. महापालिकेच्या २०१७ च्या सार्वत्रिक निवडणुकित काँग्रेसला अवघी ९७,०७१ हजार (सुमारे ४ टक्के) मते मिळाली. धक्कादायक म्हणजे जिथे दहा-पंधरा वर्षांपूर्वी ६०-७० नगरसेवकांची ताकद होती, तिथे आज एकही नगरसेवक नाही. महापालिकेच्या सभागृहात या म्हातारीचा आवाज कायमचा बंद झाला. आता शहरातसुध्दा फक्त विसर्जन बाकी आहे. पवार काका पुतण्यांमुळे राष्ट्रवादीची राक्षसी ताकद शहरात होती व आहे. केंद्रात आणि राज्यातील सत्तेच्या जोरावर भाजपाने फोडाफोडी करुन महापालिकेत सत्ता मिळविली. या घडामोडीत काँग्रेसचे बारा वाजले. कुठेतरी महागाई विरोधात आंदोलनात आठ-दहा कार्यकर्ते फोटो पुरते एकत्र येत. त्यापुढे काँग्रेसचे नामोनिशान शिल्लक राहिलेलेल नाही. काँग्रेसच्या मुंबई आणि दिल्लीतील पुढाऱ्यांना लाज वाटायला पाहिजे, पण ते निलाजरे झालेत. सचिन साठे शहराध्यक्ष या परिस्थितीत कसेबसे तोंड देत काँग्रेसचा झेंडा नाचवत होते. सात वर्षे एकाकी लढून केंद्र अथवा राज्यातील नेत्यांकडून ताकद मिळत नसल्याचे लक्षात आल्यावर त्यांनीही गेल्या आठवड्यात काँग्रेसचा तिरंगा खाली ठेवला. अजित पवार यांच्या नावावर या शहराचा सात बारा उतारा असल्याने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण असे रथीमहारथी कोणीही इकडे ढुंकून पहात नाही. राहुल गांधी, सोनिया गांधी फार दूर राहिले. इथे काँग्रेस तग धरून रहावी म्हणून एकानेही प्रयत्न केले नाहीत, ही शोकांतिका आहे.

आता कुंकवाला धनी कोण ? –
पिंपरी चिंचवड या नगराची मुहूर्तमेढ ज्यांनी रोवली ते अण्णासाहेब मगर कट्टर काँग्रेसी होते. स्वातंत्र चळवळीत देशभक्तांची फळी तयार करण्यासाठी लोकमान्य टिळकांच्या हस्ते इथे राष्ट्रीय पाठ शाळा सुरू करण्यात आली होती (आता ती जागा एका दादांच्या कंपनीकडे आहे). काँग्रेस कार्यकर्त्यांची ही खाण होती. दिवंगत शिक्षणमंत्री प्रा. रामकृष्ण मोरे आणि त्यांच्या तालमित घडलेले अनेक नेते, कार्यकर्ते काँग्रेसचा आवाज होते. दिवंगत माजी खासदार शंकरराव बाजीराव पाटील, त्यांचे पुतणे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी आमदार अशोक तापकीर अशी अनेक नावे निष्ठावंत काँग्रेसी म्हणून घेता येतील. आता मुळासकट काँग्रेस उघडली गेली. या वडाच्या पारंब्यासुध्दा शिल्लक राहिल्या नाहीत. आता हे सगळे एतिहासात जमा झाले. या शहरात कामगार, कष्टकरी, भूमिपूत्र, अमराठी जनतेचा काँग्रेस हा आधार होती. काँग्रेसला कोणी वाली नाही म्हणून आता तो जनाधार भाजपकडे सरकला. काँग्रेसचा अशा प्रकारे खात्मा हा काँग्रेस पुढाऱ्यांनीच केला. पुढच्या वर्षाला महापालिकेच्या निवडणुका आहेत. शहरात पुन्हा काँग्रेस दिसणार का ते पाहू.