पूर्ववैमनस्यातून एकावर खुनी हल्ला; तिघांना अटक

0
1099

चिंचवडगाव,दि.१८(पीसीबी) – पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून चार जणांनी एकावर कोयत्याने वार करीत खूनी हल्ला केला. ही घटना सोमवारी (दि. 16) रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास चिंचवडमधील वाल्हेकरवाडी परिसरात घडली. अवघ्या 24 तासांच्या आता पोलिसांनी तीन आरोपींच्या मुसक्‍या आवळल्या.

सुनील भिकाजी शिवले (वय 45, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) असे खूनी हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्‍तीचे नाव आहे. दीपक सुभाष आल्हाट (वय 20), ऋषभ ऊर्फ ऋषिकेश नारायण शिंदे (वय 19) आणि अक्षय रणदिवे (तिघेही रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर त्यांचा एक साथीदार पळून गेला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. भिकाजी एकनाथ शिवले (वय 76) यांनी मंगळवारी (दि. 17) चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

चिंचवडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर काटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी सुनील शिवले आणि आरोपी अक्षय रणदिवे यांच्यात पूर्वी भांडण झाले होते. ते भांडण मिटविण्याचे कारण सांगून आरोपी दीपक आल्हाट आणि अनोळखी व्यक्‍ती शिवले यांच्या घरी आली. ते सुनीलला घेऊन रणदिवेच्या घराकडे गेले. तिथे तयारीत असलेल्या आरोपींनी सुनील यांना शिवीगाळ करीत त्यांच्यावर कोयत्याने खूनी हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शिवले यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घटनेनंतर चारही आरोपी पळून गेले. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर काटे घटनास्थळी हजर झाले. त्यांनी तपासाबाबत सूचना देऊन आरोपींच्या अटकेसाठी पथके रवाना केली. अवघ्या 24 तासांच्या आत पोलिसांनी चारपैकी तीन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

या गुन्ह्यातील आरोपींवर यापूर्वी दोन गुन्हे दाखल आहेत. चिंचवड पोलिसांनी तीन आरोपींना अटक केल्यानंतर मंगळवारी रात्री त्यांची वाल्हेकरवाडी परिसरातून धिंड काढली. आरोपींना बेड्या घालून त्या परिसरातून फिरविण्यात आले.