पिंपरी चिंचवड शहरातील सर्वच नेत्यांकडून दत्ता साने यांच्या निधनावर शोक व्यक्त

0
437

पिंपरी, दि. 4 (पीसीबी): पिंपरी चिंचवड शहरातील सर्वच नेत्यांनी दत्ता साने यांच्या निधना वर शोक व्यक्त केला आहे.

आमदार लक्ष्मण जगताप म्हणाले, दत्ताकाका चांगला दिलदार मित्र होता. खुल्या मनाचा होता. दिवंगत महापौर मधुकर पवळे यांच्यापासून तो माझ्याबरोबर असायचा. 25 वर्ष आम्ही बरोबर होतो. काही महिन्यांपूर्वी आम्ही एकत्र 15 दिवस परदेशात गेलो होतो. बरोबर राहिलो, फिरलो होतो. उमद्या मनाचा दिलदार मित्र अकाली आघात करून जायला नको होता.

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, महापालिका सभागृहात आम्ही सोबत काम केले. स्पष्ट वक्ता, मनमिळाऊ स्वभावाचा दिलदार मित्र गमावला आहे. त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर माझे तीनवेळा बोलणे झाले होते. ते घाबरले, खचले होते. चांगला मित्र हरपल्याचे दुःख झाले.
‐—-
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे म्हणाले, महापालिका सभागृहात लोकांच्या प्रश्नांसाठी भांडून प्रश्न सोडून घेण्याची त्यांची वेगळी कला होती. नेहमी लोकांसाठी झटत राहणारा कार्यकर्ता होता. काकाच्या निधनाने पक्षाची मोठी हानी झाली असून ढाण्या वाघ गेला आहे.

सामाजिक बांधिलकी असणारा कार्यकर्ता गेला.
——
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार विलास लांडे म्हणाले, सामाजिक बांधिलकी असणारा, गोरगरीब जनतेसाठी  काम करणारा, भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठविणारा दत्ताकाका अचानक निघून गेला. आदरणीय शरद पवार साहेब यांच्यावर मनापासून प्रेम करणारा कार्यकर्ता होता. अजितदादांचे त्याला मार्गदर्शन असत. ज्यावेळी ग्रामीण भागातील गावे महापालिकेत समाविष्ट केली. परत वगळली आणि घेतली. त्या गावातील घरांच्या कराचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावेळी अजितदादांच्या माध्यमातून रात्री साडेबारा वाजता  मंत्रालयात बसून नगरविकास विभागाचा आदेश काढून घेतला होता. त्यावेळी आम्ही सोबत होतो. जनतेच्या कामासाठी आग्रही असणारा कामाचा माणूस गेला आहे. महापालिकेत विरोधी पक्षनेता असताना भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठविला. जनतेची प्रामाणिकपणे सेवा करणारा सहकारी गेला आहे. खूप मोठे नुकसान झाले आहे. ग्रामीण भागातील  गोरगरिबांसाठी, कष्टकरी, दिन दलितांसाठी काम करणारा नेता. विश्वासु मित्र गेला आहे. शहरात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ती भरून काढण्यासाठी राष्ट्रवादीच्या माध्यमातून त्यांची स्वप्ने पूर्ण करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो अशी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना.
—-
माजी महापौर योगेश बहल म्हणाले, दत्ताकाका आणि मी बजाज ऑटोत सोबत कामाला होतो. माझ्यानंतर त्यांनीही कंपनीतील काम सोडले. एखादी गोष्ट नाही पटली तर वेळप्रसंगी पक्षाच्या विरोधात भूमिका घेत असत. पण जे मनाला पटेल तेच करत असत. कोणाची भीड बाळगत नव्हते. सर्वांना सहकार्य करण्याची भूमिका घेत. कधी कोणाला नाहक त्रास दिला नाही.  कोणाचे नुकसान केले नाही. विरोधी पक्षनेता म्हणून चांगली कामगिरी केली.  अनेक वर्षे बाकीच्या पदांची इच्छा होती. आमदारकीची निवडणूक लढविण्याची  इच्छा होती. परंतु, संधी मिळाली नाही. सर्वांना सहकार्य करणारा कर्तबगार नेता गमावला आहे.
—–
काकांच्या निधनाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मोठी हानी झाली.
—–

शिवसेनेच्या सुलभा उबाळे म्हणाल्या, आम्ही सभागृहात नगरसेवक म्हणून सोबत होतो. बोलताना काका मला ‘मातोश्री’ म्हणून हाक मारत असत. त्यामुळे कुटुंबातील सदस्यच गेल्याचं दुःख झालंय. काका कधीही कोणाला उलट बोलत नसे. अनेकदा एखादी गोष्ट करू नको, म्हटले तरी काका मनाला वाटेल तेच करत असे. कधी कोणाचे ऐकले नाही. काका नेहमी प्रवाहाच्या विरोधात पोहत असत. नेहमी लोकांमध्ये राहणारा काका कोरोनाच्या काळातही लोकांमध्ये मिसळला. स्वभावाप्रमाणेच कोरोनाच्या काळातही प्रवाहाच्या विरोधात गेला. काकाने काळजी घ्यायला हवी होती.