पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्तपद सुद्धा कंत्राटी पद्धतीने भरा

0
169

पिंपरी, दि. ६ (पीसीबी) – शिक्षकांची कंत्राटी पध्दतीने भरती करणाऱ्या पिंपरी चिंचवड महापालिकेत आता आयुक्तसुध्दा कंत्राटी पध्दतीने भरा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राहुल कोल्हटकर यांनी केली आहे. प्रसिध्दीपत्रकात ते म्हणतात, पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे गेल्या २ वर्षापासून प्रशासकीय राजवट असल्याने महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून श्री.शेखर सिंह व अधिकारी मनपाचा पूर्ण कारभार पाहतात. प्रशासकीय राजवट असल्याने शहरात अनेक विकासकामे नव्याने होतील तसेच रस्ते, स्वच्छ्ता, नागरी प्रश्न यांना केंद्रस्थानी ठेवून कामे मार्गी लागतील अशी आशा होती तसेच कार्यक्षम आयुक्त असल्याने महानगरपालिकेतील चुकीच्या कामांना लगाम घातला जाईल असे वाटत होते. उपायुक्त आणि वरिष्ठ अधिकारी यांना सोबत घेऊनच ठेकेदारी चालवली जात आहे. याचे उदाहरण द्यायचे झाले तर पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षण विभागाच्या वतीने ३२ प्राथमिक शाळांमध्ये ३२ क्रीडा शिक्षक हे मानधन तत्वावर घेण्याऐवजी ठेकेदारी पद्धतीने एका संस्थेच्या माध्यमातुन भरले जाणार आहेत.

शहरातील मनपाच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी वर्गात क्रीडा संस्कृतीची आवड निर्माण व्हावी तसेच शारीरिक विकास होऊन खेळात निपूनता यावी या उद्देशाने क्रीडा शिक्षक यांची नियुक्ती करण्यात येत आहे असे मा.आयुक्त श्री. शेखर सिंह यांचे म्हणणे आहे. क्रीडा शिक्षक भरतीला आमचा विरोध नाही आहे पण क्रिडा शिक्षण मानधन तत्वावर भरण्याऐवजी शिक्षण विभागात ठेकेदारी पद्धतीचा अवलंब करणे चुकीचे आहे. याकरिता पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षण विभागाच्या वतीने १ कोटी १० लाख ८८ हजार रुपयाची निविदा काढण्यात आली. त्या निविदा प्रक्रियेत ३ संस्था यांनी सहभाग घेतला त्यापैकी २ संस्था पात्र ठरल्या तर मे. किंडर स्पोर्टस यांची ५ टक्के जादा दर असलेली १ कोटी १६ लाख ४२ हजार ४०० रुपयाची निविदा लघुत्तम दराची ठरवून त्यांना काम देण्याचा निर्णय मा.आयुक्त श्री.शेखर सिंह व मनपा प्रशासन यांच्या वतीने घेण्यात आला. पालिका शाळांमध्ये यापूर्वी मानधन तत्वावर शिक्षक भरती केली जात होती पण शिक्षक भरतीच ठेकेदार पद्धतीनें करून पैसे कमविण्याचा नवा पायंडा महानगरपालिका शिक्षण विभागात पडला जात असल्याने करदात्या नागरिकाच्या मनात एक या प्रकाराबाबत शंका निर्माण होत आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका यामध्ये वेळोवेळी शिक्षकांची रिक्त पदे मानधन तत्वावर भरली गेली आहेत आणि मानधन तत्वावर कार्यरत असणारे हे शिक्षक उत्कृष्ट कामगिरी करत आहे असे शिक्षण विभाग यांचे म्हणणे आहे. मागील वेळी शहरातील मनपा शाळेत कला शिक्षक भरती केली गेली ती सुध्दा मानधन तत्वावर करण्यात आली मग असे असताना यावेळी क्रीडा शिक्षक भरती करताना ठेकेदारी पद्धतीचा अवलंब का केला गेला ? व नेमका ठेकेदारी पद्धतीचा फायदा कोणाला होणार आणि शिक्षणासारख्या पवित्र कार्यात अशा चुकीच्या कामाचा / पद्धतीचा शिरकाव पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्री.शेखर सिंह का करत आहे अशा प्रश्न निर्माण होत असल्याने. मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब , मुख्यमंत्री (महा.राज्य) आपणांस सदर निवेदनाच्या माध्यमातून विनंती आहे की , कंत्राटी पध्दतीने शिक्षक भरती करणा-या पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्तपद सुध्दा कंत्राटी पद्धतीने भरावे, असे आदेश लवकरात लवकर शासनाच्या वतीने पारित करावेत असे कोल्हटकर यांनी म्हटले आहे