पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समिती सभापतीपदासाठी भाजपमध्ये बंडखोरी; विलास मडिगेरी आणि शीतल शिंदे यांचे अर्ज

0
844

पिंपरी, दि. २ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी सत्ताधारी भाजपकडून भोसरी विधानसभा मतदारसंघातील नगरसेवक विलास मडिगेरी यांचा उमेदवारी अर्ज शनिवारी (दि. २) प्रशासनाकडे सादर करण्यात आला. दरम्यान भाजपचेच पिंपरी विधानसभा मतदारसंघातील शीतल शिंदे यांनीही सभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने भाजपमध्ये दुफळी निर्माण झाली आहे. शीतल शिंदे यांना राष्ट्रवादीचे चार आणि शिवसेनेच्या एका नगरसेवकाचा पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थायी समिती सभापतीपदासाठी निवडणूक अटळ असल्याचे मानले जात आहे. परंतु, भाजपचे पक्षश्रेष्ठी ही निवडणूक होऊ नये, यासाठी मडिगेरी की शिंदे यांना आपला उमेदवारी अर्ज माघारी घ्यायला लावतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

फेब्रुवारी २०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्ता परिवर्तन झाले. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या या महापालिकेत भाजपचे कमळ फुलले. आता भाजपच्या सत्ता काळाचे तिसरे वर्ष सुरू झाले आहे. तिसऱ्या वर्षीच्या स्थायी समिती सभापतीसाठी उमेदवारी अर्ज सादर करण्यास शनिवारी दुपारी पाच वाजेपर्यंत मुदत होती. महापालिकेत भाजपचे बहुमत असल्यामुळे या पक्षाकडून ज्या नगरसेवकाचा अर्ज भरला जाणार, तेच स्थायीचे सभापती असणार हे निश्चित समजले जात होते. त्यामुळे सभापतीपदासाठी अर्ज भरण्याच्या मुदतीत कोणत्या नगरसेवकाचा अर्ज भरला जाणार याबाबत उत्सुकता होती.

सभापतीपदासाठी भाजपचे पिंपरी विधानसभा मतदारसंघातील नगरसेवक शीतल शिंदे, भोसरी विधानसभा मतदारसंघातील संतोष लोंढे, चिंचवड विधानसभा मतदारसंघातील आरती चोंधे हे तीघेजण इच्छुक होते. या तिघांपैकी शीतल शिंदे यांचे पारडे जड मानले जात होते. परंतु, महापालिकेत सत्ताधारी भाजपने अचानकपणे विलास मडिगेरी यांचे नाव पुढे केले. त्यावरून भाजपमध्ये अचानक राजकीय ट्विस्ट निर्माण झाले आहे. सभापतीपदासाठी मडिगेरी यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर भाजपच्याच शीतल शिंदे यांनीही आपला उमेदवारी अर्ज नगरसचिव उल्हास जगताप यांच्याकडे सादर केला आहे.

त्यामुळे भाजपमध्ये दुफळी निर्माण झाली आहे. भाजपच्या शीतल शिंदे यांना स्थायी समितीतील राष्ट्रवादीच्या चार आणि शिवसेनेच्या एका नगरसेवकानेही पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे शिंदे यांनी स्थायी समिती सभापतीच्या निवडणुकीत रंगत निर्माण केली आहे. येत्या ७ मार्च (गुरूवारी) रोजी सभापतीपदासाठी निवडणुकीची औपचारिकता पूर्ण केली जाणार आहे. आता ही निवडणूक होणार की भाजपचे पक्षश्रेष्ठी मडिगेरी किंवा शिंदे यांच्यापैकी कोणाला उमेदवारी अर्ज माघारी घ्यायला लावतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.