पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीवर या आठ नगरसेवकांची झाली निवड

0
463

पिंपरी, दि. २२ (पीसीबी) –  पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या असलेल्या स्थायी समितीवर बुधवारी (दि. २०) झालेल्या सर्वसाधारण सभेत भाजपच्या पाच, राष्ट्रवादीच्या दोन आणि शिवसेनेच्या एका नगरसेवकाची निवड करण्यात आली. त्यामध्ये भाजपच्या  आरती चोंधे, शितल शिंदे, संतोष लोंढे, राजेंद्र लांडगे, झामाबाई बारणे   या पाच नगरसेवकांचा तसेच राष्ट्रवादीच्या  मयुर कलाटे, पंकज भालेकर  या दोन नगरसेवकांचा आणि शिवसेनेच्या  राहुल कलाटे  या नगरसेवकाचा समावेश आहे.

फेब्रुवारी २०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत सत्तापरिवर्तन झाले. महापालिकेत प्रथमच कमळ फुलले आणि भाजप सत्ताधीश बनला. राष्ट्रवादीला विरोधी पक्षात बसावे लागले. या निवडणुकीत काँग्रेसला भोपळाही फोडता आला नाही. त्यामुळे हा राष्ट्रीय पक्ष महापालिकेतून हद्दपार झाला. शिवसेनेचे संख्याबळ घटले, तर पाच अपक्ष निवडून आले आहेत. एका नगरसेवकासह मनसेचे महापालिकेतील अस्तित्त्व कायम आहे.

महापालिकेतील सत्ताबदलाचे दोन वर्ष सरले असून, तिसरे वर्ष सुरू आहे. महापालिकेत स्थायी समिती ही महत्त्वाची समिती मानली जाते. या समितीला आर्थिक निर्णय घेण्याचे सर्वाधिकार असल्यामुळे महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या या समितीकडे असतात. ही समिती १६ सदस्यांची आहे. महापालिकेत निवडून आलेल्या राजकीय पक्षांच्या नगरसेवकांच्या संख्याबळानुसार महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत या १६ सदस्यांची निवड केली जाते. या सदस्यांमधून नंतर स्थायी समितीचा सभापती निवडला जातो.

पक्षीय संख्याबळानुसार भाजपचे १०, राष्ट्रवादीचे ४, शिवसेनेचा एक आणि एका अपक्ष नगरसेवकाची स्थायी समितीवर निवड केली जाते. पहिल्या वर्षी १६ सदस्य निवडण्यात आले. वर्ष संपल्यानंतर नियमानुसार त्यातील ८ सदस्य (भाजपचे सहा, राष्ट्रवादीचे दोन) निवृत्त झाले. परंतु, भाजपने प्रत्येक नगरसेवकाला संधी देण्याच्या धोरणानुसार पक्षाच्या उर्वरित चार आणि अपक्ष नगरसेवकाचा राजीनामा घेतला. राष्ट्रवादी आणि शिवसेनेने आपल्या नगरसेवकांना स्थायी समितीत कायम ठेवले.

स्थायी समितीचे दुसरे वर्ष येत्या २८ फेब्रुवारीला संपणार आहे. त्यामुळे यावर्षी स्थायी समितीतून निवृत्त होणाऱ्या  नगरसेवकांच्या जागेवर नवीन नगरसेवकांची फेब्रुवारी महिन्याच्या सर्वसाधारण सभेत निवड करणे कायद्याने गरजेचे होते. त्यानुसार भाजपने सर्वसाधरण सभेत स्थायी समितीवर  आरती चोंधे, शितल शिंदे, संतोष लोंढे, राजेंद्र लांडगे, झामाबाई बारणे  या पाच नगरसेवकांची वर्णी लावली. राष्ट्रवादीचे स्थायी समितीतील सदस्य मोरेश्वर भोंडवे आणि राजू मिसाळ हे निवृत्त होत आहेत. त्यांच्या जागेवर राष्ट्रवादीने   मयुर कलाटे, पंकज भालेकर  या दोन नगरसेवकांची स्थायी समितीवर निवड केली. स्थायीमध्ये शिवसेनेच्या एका नगरसेवकाची निवड होते. सध्या अमित गावडे हे स्थायी समिती सदस्य आहेत. त्यांचा दोन वर्षांचा कार्यकाल पूर्ण होणार असल्याने त्यांच्या जागेवर शिवसेनेच्या  राहुल कलाटे  या नगरसेवकाला स्थायीमध्ये संधी देण्यात आली.

स्थायी समितीवर निवड झालेल्या या नगरसेवकांच्या नावाची त्या त्या पक्षांच्या गटनेत्यांनी महापौरांकडे शिफारस केली. महापौर राहुल जाधव यांनी गटनेत्यांनी नावे दिलेल्या नगरसेवकांची स्थायी समितीवर निवड केल्याचे जाहीर केले. आता या सदस्यांमधून स्थायी समितीचा सभापती निवडला जाणार आहे. या समितीत भाजपचे बहुमत असल्यामुळे सभापतीपदी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.