काळेवाडीत झायलो कार जळून खाक; दोन तरुण जखमी

0
874

चिंचवड, दि. २२ (पीसीबी) – शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत एक झायलो कार जळून खाक झाली असून या आगीत दोन तरुण किरकोळ भाजले आहेत. ही घटना आज (शुक्रवारी) पहाटेच्या सुमारास काळेवाडीतील ज्योतीबानगर येथे घडली.

गणेश वायभट (वय २१) आणि योगेश वायभट (वय २३) असे जखमी तरुणांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटेच्या सुमारास काळेवाडी येथील ज्योतीबानगरमध्ये महिंद्रा झायलो (एमएच/१४/बीए/६४६४) या कारला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती पिंपरीतील मुख्य अग्निशमन केंद्रास मिळाली होती. त्यानुसार, संत तुकारामनगर आणि चिखळी येथून प्रत्येकी एक बंब अग्निशमन दलाच्या जवानांसह घटनास्थळी दाखल झाले आणि आग आटोक्यात आणण्यात आली. या आगीत गणेश आणि योगेश हे दोन तरुण किरकोळ जखमी झाले असून त्यांना पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर कार पूर्णपणे जळून खाक झाली आहे.