पिंपरी-चिंचवड भाजपाच्या मतांमध्ये मोठी फूट

0
530

– ‘पीएमआरडीए’च्या निवडणुकीत पहिल्या फेरीत तीन नगरसेवकांच्या मतांचा कोटा अपूर्णच

पिंपरी, दि. १२ (पीसीबी) – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए)च्या नियोजन समितीच्या निवडणुकीत पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या मतांमध्ये मोठी फाटाफूट झाली आहे. आपला किल्ला अभेद्य असल्याचा भाजपाचा दावा फोल ठरला आहे. भाजपाचे सर्व सहा उमेदवार विजयी झाले, परंतु जयश्री गावडे चंद्रकांत नखाते, वसंत बोराटे यांना पहिल्या फेरीअखेर मतांचा कोटा पूर्ण करता आलेला नाही, असे स्पष्ट झाले. दरम्यान, भाजपामध्ये अंतर्गत खदखद असल्याचेही या निमित्ताने उघड झाले.

नियोजन समितीच्या ३० जागांसाठी बुधवारी (दि.१०) मतदान झाले होते. पिंपरी-चिंचवडमध्ये एकूण ९५ टक्के मतदान झाले. भाजपाच्या सर्व ७५ नगरसेवकांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यातील २२ जागा पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत, एक नगरपालिका क्षेत्रासाठी, तर सात जागा ग्रामपंचायत हद्दीकरीता आहेत. पुणे महापालिका हद्दीत एका काँग्रेस उमेदवारामुळे मतदान घ्यावे लागले. सुमारे ९ नगरसेवकांची मते फुटल्याचा अंदाज व्यक्त केला जातो.

दरम्यान, पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील ९ जागांसाठी भाजपाचे सहा उमेदवार रिंगणात होते. सभागृहनेते नामदेव ढाके, नगरसेवक चंद्रकांत नखाते, संदीप कस्पटे, निर्मला गायकवाड, वसंत बोराटे, जयश्री गावडे हे जिंकले, पण पहिल्या फेरीअखेर नखाते यांना फक्त १० तर सत्ताधारी नेते नामादेव ढाके, जयश्री गावडे, वसंत बोराटे यांना प्रत्येकी ११ मते होती. नगरसेवकांना ठरवून दिल्या प्रमाणे मतदान न झाल्याने पहिल्या फेरितच धाकधूक वाढली होती. कोणाचे मतदान फुटले याबाबात आता शोध सुरू आहे. अपेक्षित मते का मिळाली नाहीत याबाबत भाजपाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये कुजबूज आहे.
सत्ताधारी नेते नामदेव ढाके यांना विचारणा केली असता ते म्हणाले, होय, पहिल्या फेरीत नखाते यांना १० तर गावडे, बोराटे आणि मला ११ मते मिळाली होती मात्र दुसऱ्या फेरीत सगळे जिंकले. ठरल्यानुसार मते पडली आणि कोणतिही फाटाफूट झालेली नाही.

महापालिका निवडणूक अवघ्या दोन महिन्यांवर आली असताना सत्ताधारी भाजपामधील सुमारे २५ ते ३० नाराज नगरसेवक बाहेर पडणार आहेत, अशी चर्चा पिंपरी-चिंचवडच्या राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. त्यामुळे पीएमआरडीएच्या निवडणुकीत भाजपातील नाराज बंडखोरी करीत विरोधी पक्षाच्या उमेदवारांना मतदान करतील, असा अंदाज वर्तवला जात होता. सर्वांत जेष्ठ नगरसेवक असूनही जयश्री गावडे, नखाते यांना पाच वर्षांत महत्वाचे पद मिळाले नाही म्हणून ते नाराज होते. संदीप कस्पटे, निर्मला गायकवाड आणि वसंत बाराटे यांनाही आश्वासन दिले, पण एकही महत्वाचे पद दिले नाही म्हणून खदखद होती.

आमदार महेश लांडगे यांनी शेवटच्या टप्प्यात आपल्या दोन्ही समर्थक नगरसेवकांना तर आमदार लक्ष्मण जगताप यांनी गावडे व कस्पटे यांना सधी देऊन त्यांची नाराजी दूर कऱण्याचा प्रयत्न केला. थेट पुणे जिल्ह्यासाठी काम करणाऱ्या नियोजन समितीवर काम करण्याची संधी उपलब्ध करुन दिली. प्रत्यक्षात नगरसेवक पदाची मुदत संपल्यावर पीएमआरडीए सदस्याची मुदत अपोआप सपुष्टात येणार असल्याने हे सगळे औट घटकेचे राजे ठऱणार आहेत.