पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे औपचारिक उद्घाटन बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार

0
856

पिंपरी, दि. ८ (पीसीबी) – बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असलेल्या पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या प्रशासकीय इमारतीचे औपचारिक उद्घाटन उद्या बुधवार (दि.९) सायंकाळी साडेचारच्या सुमारास मुख्यमंत्री आणि गृह मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती आज (मंगळवार) अपर पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांनी दिली आहे.

बुधवार (दि.१५ ऑगस्ट २०१८) रोजी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालयाचे पिंपरी महापालिकेच्या चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथे प्राथमिक स्वरुपात पालकमंत्री गिरीष बापट यांच्या हस्ते उद्घाटन करुन कार्यान्वीत करण्यात आले होते. मात्र आयुक्त कार्यालयाचे चिंचवड पूर्णानगर प्रेम लोक पार्क येथील प्रशासकीय इमारतीचे काम प्रलंबीत होते. या इमारतीचे काम डिसेंबर २०१८ मधे पूर्ण झाले. त्यानंतर मंगळवार (दि.१ जानेवारी) रोजी आयुक्त कार्यालय ऑटो क्लस्टर येथून प्रेम लोक पार्क येथे स्थलांतरीत करण्यात आले. उद्या बुधवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते प्रथमत: प्रशासकीय इमारतीचे फित कापून आणि कोणशीलेचे अनावरण करुन उद्घाटन करण्यात येणार आहे. त्यानंतर चिंचवड येथील रामकृष्ण मोरे सभागृहात जाहिर कार्यक्रम होणार आहे.