कम्युनिटी लेव्हल कंपोस्टींगचे दोन प्रकल्प मंजूर…

0
227

 पिंपरी, दि. ३० (पीसीबी) – पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी अंतर्गत महानगरपालिकेच्या उद्यानांमधील पाला पाचोळा व ओला कचरा यावर प्रक्रीया करण्यासाठी “कम्युनिटी लेव्हल कंपोस्टींग” हा प्रकल्प्‍ राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पाद्वारे दररोज शंभर किलो ओल्या कच-यावर प्रक्रीया करून त्याद्वारे खत तयार करण्यात येणार आहे. स्मार्ट सिटी योजनेचा एक भाग असलेल्या ए,बी,डी क्षेत्रात दोन कम्युनिटी लेव्हल कंपोस्टिंग प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी मे. Earth Care Equipment Private Limited यांचे नियुक्ती करण्यात आली आहे. यासाठी येणा-या अंदाजित २७ लाखांच्या खर्चास आज मंजूरी देण्यात आली.

 

 

पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड संचालक मंडळाची १६ वी बैठक आज गुरुवार (दि.३०) सकाळी ११.०० वाजता, स्मार्ट सिटी कार्यालय, ऑटो क्लस्टर, चिंचवड येथे पार पडली. महापौर तथा संचालक श्रीम. उषा उर्फ माई ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.

महापौर म्हणाल्या की, पिंपरी चिंचवड शहरात प्रायोगिक तत्वावर दोन उद्यानांमध्ये “कम्युनिटी लेव्हल कंपोस्टींग” हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्यानंतर, महानगरपालिकेच्या सर्वच उद्यानांमध्ये हा प्रकल्प राबविण्यात येईल. स्मार्ट सिटी अंतर्गत विकास कामांचा विस्तार वाढला आहे. केंद्र शासनाच्या सुचनेनुसार हे विकामकामे होत असून काही कामे पुर्णत्वावर आहेत. कोविड १९ च्या प्रादुर्भावामुळे अनेक विकासकामे त्याच ठिकाणी थांबली. त्याचा परिणाम स्मार्ट सिटी अंतर्गत सुरु असलेल्या विकास कामांवर झाला असून ही कामे त्वरीत पूर्ण करून ही नागरिकांसाठी व प्रशासनासाठी खुली करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी, मुख्य कार्यकारी अधिकारी तथा आयुक्त राजेश पाटील, सत्तारुढ पक्षनेता तथा संचालक नामदेव ढाके, मुख्य कार्यकारी अधिकारी तथा पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, संचालक सचिन ‍चिखले, स्वतंत्र संचालक प्रदीपकुमार भार्गव, सह मुख्य कार्यकारी अधिकारी (एबीडी) राजन पाटील, सह मुख्य कार्यकारी अधिकारी (पॅन सिटी) निळकंठ पोमण, मुख्य वित्तीय अधिकारी सुनिल भोसले, कंपनी सचिव चित्रा पंवार, जनरल मॅनेजर इन्फ्रा अशोक भालकर, कार्यकारी अभियंता मनोज सेठीया, सहा.मुख्य कार्यकारी अध‍िकारी लक्ष्मीकांत कोल्हे हे प्रत्यक्ष तर केंद्रीय सचिव ममता बात्रा, स्वतंत्र संचालक यशवंत भावे हे मान्यवर बैठकीस ऑनलाईन उपस्थित होते. सदर बैठकीच्या कार्यपत्रिकेवरील एकुण १४ विषयांवर चर्चा करून मंजूरी देण्यात आली.

यामध्ये, स्मार्ट सिटी करीता माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान अंतर्गत स्मार्ट सिटी प्रकल्पांना तांत्रिक सल्लागार, प्रकल्प व्यवस्थापन आणि सेवा प्रदान करणेकरीता मे. E&Y LLP यांना मुदत वाढ देण्यात आली. सिटी नेटवर्क आणि इतर स्मार्ट एलिमेंट्स प्रोजेक्ट (RFP-2) साठी मे. L&T , इंटिग्रेटेड कमांड सेंटर (ICCC) आणि इतर स्मार्ट एलिमेंट प्रोजेक्ट (RFP-3) विस्ताराकरीता मे. Tech Mahindra यांच्या मुदत वाढीबाबत चर्चा करून सदर विषयास मंजूरी देण्यात आली. स्मार्ट सिटी प्रकल्पांच्या (RFP2 आणि RFP3) स्वतंत्र निविदा प्रक्रियेद्वारे विविध स्मार्ट घटकांना वीज पुरवठा करण्यासाठी विद्युत पायाभूत सुविधांकरीता तयार केलेल्या अंदाज पत्रक आणि तरतुदींवर चर्चा करून त्यास मंजूरी देण्यात आली. तसेच, बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.