पिंपरी चिंचवडमधील धक्कादायक प्रकार! म्हणून ‘त्या’ समाजातील कुटुंबाला वाळीत टाकण्यात आलं

0
302

वाकड, दि.०२ (पीसीबी) : पिंपरी चिंचवड शहराचा विकास जसा होत चालला आहे. तसाच काही लोक याच शहरात अंधश्रद्धा नरबळी आणि जातपंचायत भक्कम करण्याचा अयशस्वी प्रयत्न करत आहेत. असाच एक धक्कादायक प्रकार वाकड येथे उघडकीस आला आहे. जातपंचायतीकडून घटस्फोट न घेतल्याने एका गोंधळी समाजातील कुटुंबाला वाळीत टाकले आहे. हा प्रकार 16 मार्च 2018 पासून 1 सप्टेंबर 2021 या कालावधीत न्यू दत्त नगर वाकड आणि महिंदरगी , ता . अक्कलकोट , जि . सोलापूर येथे घडला . याप्रकरणी 14 जणांच्या विरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिताराम कृष्णा सागरे ( वय 33 , रा . न्यू दत्त नगर , वाकड ) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे

करेप्पा मारुती वाघमारे , बाजीराव करेप्पा वाघमारे , साहेबराव करेप्पा वाघमारे , बाळकृष्ण करेप्पा वाघमारे ( चौघे रा . वाल्हेकरवाडी , चिंचवड ) , मोहन शामराव उगाडे , मनोज सागरे , विजय सागरे , रामदास भोरे , अमर भोरे , महादेव भोरे , मारुती वाघमारे , विष्णू वाघमारे , अमृत भोरे , गोविंद वाघमारे अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , फिर्यादी सिताराम हे गोंधळी समाजाचे आहेत . आरोपी त्यांच्या समाजामध्ये जात पंचायत चालवितात.आरोपी करेप्पा , बाजीराव , साहेबराव आणि बाळकृष्ण हे त्या जातपंचायतीचे पाटील आहेत . तर अन्य आरोपी पंच म्हणून काम पाहतात . फिर्यादी सिताराम यांची पत्नी ही जातपंचायतीच्या पाटलांची नातेवाईक आहे . फिर्यादी सिताराम आणि त्यांच्या पत्नीचा कौटुंबिक वादातून घटस्फोटाचा दावा न्यायालयात चालू आहे . असे असताना फिर्यादी सिताराम यांनी जातपंचायतीकडून घटस्फोट घेतला नाही , याचा राग मनात धरून फिर्यादी सिताराम आणि त्यांच्या कुटुंबाला समाजातून वाळीत टाकले . याप्रकरणी सामाजिक बहिष्कार ( प्रतिबंध व निवारण ) अधिनियम 2016 चे कलम 5,6 प्रमाणे तसेच भारतीय दंड विधान 120 ( ब ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे . वाकड पोलीस अधिक तपास करीत आहेत .