पिंपरी-चिंचवडकरांनो, चऱ्होली ते लोहगाव दरम्यान सोन्याचा रस्ता बनतोय…आश्चर्यचकित झाला ना…मग हे वाचाच!

0
619

पिंपरी, दि. ७ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवडकरांनो, आगामी एक-दोन वर्षांत तुम्ही चऱ्होलीमार्गे लोहगाव विमानतळाकडे जाणार असाल, तर लक्षात ठेवा तुम्ही सोन्याच्या रस्त्यावरून प्रवास करणार आहात. दचकलात ना! होय, तुम्ही या भागातून जाताना डांबरी रस्ता दिसला, तरी तो सोन्यासारखा रस्ता आहे, हे तुम्हाला जाणवू द्या. कारण पिंपरी-चिंचवड महापालिका चऱ्होली ते लोहगाव दरम्यान तब्बल ९३ कोटींचा रस्ता बनवणार आहे. हा रस्ता पूर्णपणे वाहतुकीसाठी तयार होईपर्यंत वाढीव खर्चाच्या नावाखाली रस्त्याच्या कामाचा खर्च १०० कोटींच्या पार जाणार आहे. महापालिकेने या कामासाठी ८४ कोटींची निविदा प्रसिद्ध केली होती. स्थायी समितीने प्रत्यक्षात ९३ कोटींना मंजुरी दिली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या खर्चामध्ये केवळ आणि केवळ रस्ताच तयार केला जाणार आहे. या रस्त्याला ना फुटपाथ असेल, ना पाणीपुरवठ्याची पाईपलाइन, ना सांडपाणीवाहिनी असेल. त्यामुळे शहरातील करदात्यांनो तुम्ही कधी या रस्त्याने गेलात, तर सोन्याच्या रस्त्यावरून गेल्याचा भास झाल्यास आश्चर्य वाटून घेऊ नका.