नयनतारा सहगलांना मनसेचा विरोध असण्याचे कारणच नाही – राज ठाकरे  

0
912

मुंबई, दि. ७ (पीसीबी) – नयनतारा सहगल यांच्या सारख्या ज्येष्ठ लेखिका जर संमेलनात येणार असतील आणि त्यांच्यासमोर जर मराठी साहित्याची समृद्ध परंपरा खुली होणार असेल आणि त्या जर ही परंपरा जगासमोर नेण्याच्या प्रक्रियेत एक वाहक असतील, तर मला अथवा माझ्या पक्षाला आक्षेप असायचे कारणच नाही, अशी  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

यवतमाळमध्ये होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनाची आयोजक संस्था आणि मराठी साहित्य महामंडळ यांच्यातील तीव्र मतभेदांची परिणती रविवारी संमेलनाच्या नियोजित उद्घाटक साहित्य अकादमी पुरस्कारविजेत्या लेखिका नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द करण्यात झाली.  संमेलनाचे कार्याध्यक्ष डॉ. रमाकांत कोलते यांनी नयनतारा सहगल यांना पत्र पाठवून उद्घाटक म्हणून दिलेले निमंत्रण रद्द करीत असल्याचे कळवले.  यावर राज ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला इंग्रजीत लिहिणाऱ्या लेखिकेला का बोलावले, असा आक्षेप नोंदवत काही स्थानिक संघटनांनी संमेलन उधळण्याचा इशारा दिला होता. मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचाही यात समावेश होता. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी आज (सोमवारी) सकाळी ट्विटरवरुन भूमिका स्पष्ट केली आहे.