पिंपरी ‘कॅम्पा’त व्यापारी अन् महापालिका अधिका-यांमध्ये तु-तु ,मै-मै

0
310

पिंपरी, दि. १८ (पीसीबी) – प्लास्टीक पिशव्यांच्या कारवाईवरुन पिंपरी कॅम्पातील व्यापारी आणि महापालिका अधिका-यांमध्ये शाब्दीक वादावादी झाल्याने कारवाईच्या निषेधार्थ व्यापा-यांनी दुपारी बाजारपेठ बंद ठेवली. आयुक्तांनी व्यापा-यांशी चर्चा केली. त्यांची बाजू जाणून घेतल्यानंतर व्यापा-यांची दुकाने खुली केली.

प्लास्टिक वापरावर बंदी आहे. महापालिकेने प्लास्टिक वापरणा-यांविरोधात कारवाई तीव्र केली आहे. आज (बुधवारी) सकाळी महापालिकेचे प्लास्टिक विरोधी पथक पिंपरी कॅम्पात धडकले. प्लास्टिक वापर करणा-या दुकानांलर कारवाई सुरु केली. पवन ड्रायफुड येथील कारवाई दरम्यान व्यापारी आणि महापालिका अधिका-यांमध्ये वादावादी झाली. काही ठिकाणी पाच हजार तर काही ठिकाणी दोन हजार रुपयांच्या दंडात्मक पावत्या फाडल्याचा आरोप व्यापा-यांनी केला. आमच्याकडे प्लास्टिक नियमानुसार वापरण्यास परवानगी असलेल्या जाडीच्या बॅगा आहेत. असे असतानाही कारवाई कशी केली जात? असा सवाल व्यापा-यांनी केली.

त्यावर अधिका-यांनी 75 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकवर बंदी असल्याचे सांगितले. त्यावरुन वादावादीला सुरुवात झाली. अधिका-यांनी झटापटीचा केल्याचा आरोप व्यापा-यांनी केला. अधिका-यांनी दुकानात येऊन प्लास्टिक पिशव्यांची तपासणी करावी. त्याला आमची हरकत नाही. पण, एक दोन अधिकारी येण्याऐवजी 10 ते 15 जण थेट दुकानात घुसतात. अरेरावीने बोलतात. आम्ही का चोर आहोत का, प्लास्टिक सापडले तर कारवाई करावी. पण, अधिका-यांची दुकानात घुसण्याची, बोलण्याची पद्धत चुकीची आहे. शासकीय कामात अडथळा आणण्याचे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली जाते असा आरोपही व्यापा-यांनी केला. त्यामुळे कारवाईविरोधात सर्व व्यापारी एकत्र आले. तीन तास बाजारपेठ बंद केली. त्यानंतर व्यापा-यांनी आयुक्तांशी चर्चा केली. आयुक्तांनी चौकशीचे आश्वासन दिल्यानंतर व्यापा-यांनी आंदोलन मागे घेत बाजारपेठ सुरु केली.

आयुक्त राजेश पाटील यांनी सहाय्यक आयुक्त रविकिरण घोडके यांनी व्यापा-यांची बाजू जाणून घेण्यासाठी कॅम्पात पाठविले होते. घोडके म्हणाले, ”75 मायक्रॉनच्या बॅगा उपलब्ध होत नसल्याने दुस-या बॅगा वापरत असल्याचे व्यापा-यांनी सांगितले. व्यापा-यांचे मत जाणून घेतले. निवेदन स्वीकारले. व्यापा-यांच्या समस्या आयुक्तांपर्यंत पोहचविल्या जातील. प्लास्किटकचा वापर कमी करावा. कापडी पिशव्यांचे वापर करणे काळाची गरज आहे. प्लास्किट निर्मुलानाकरिता महापालिका प्रयत्न करत आहे. त्याला नागरिकांनी सहकार्य करावे”.

व्यापा-यांचे सवाल?
# दुकानामध्ये 51 मायक्रॉनच्या पिशव्या वापरण्यास परवानगी असताना दंड कशासाठी?
#तपासणीचा अधिकार कोणाला, तपासणीसाठी अधिकारी सोडून सर्व कर्मचारी घुसतात, 10 ते 12 जण एकाचवेळी घुसून दहशत निर्माण करतात.
# तपासणीनंतर पंचनामा न करता बळजबरीने दंडाची पावती फाडण्यासाठी दबाव
# पैसै दिले नाही तर 353 अंतर्गत गुन्हे दाखल करण्याची धमकी
# तपासणी पथकासोबतच्या मार्शलची अरेरावीची भाषा, अंगावर धावून येणे
#प्लास्टिक उत्पादकांच्या दुकानांच्या तपासणीऐवजी किरकोळ व्यापा-यांच्या दुकानांची तपासणी
#अतिक्रमणावर कारवाई न करता व्यापा-यांवर कारवाई
#आज कारवाईदरम्यान दुकान मालकाच्या मुलाला धक्काबुक्की