पिंपरीत डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात ऑक्सिजनअभावी रूग्णाचा मृत्यू

0
432

पिंपरी, दि. ५ (पीसीबी) – येथील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात रुग्णाला ऑक्सिजनअभावी आपला जीव गमवावा लागला. ही घटना बुधवारी (दि.४) रात्री अकराच्या सुमारास घडली. रूग्णालयाच्या या गलथान कारभारावर नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे.    संदीप नवनाथ बनसोडे (वय २५, रा. आदर्शनगर, पिंपरी) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संदीप पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात १२ दिवसापासून अॅडमीट होता. बुधवारी सकाळी संदीपच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्याला अतिदक्षता विभागातून बाहेर जनरल कक्षात हलवण्यात येईल, असे डॉक्टरांनी सांगितले. दुपारी संदीपसाठी ज्यूस मागवण्यात आला होता. मात्र, सायंकाळी त्याचा एमआरआय करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याला रात्री ११ वाजता एमआरआय करण्यासाठी नेण्यात आले.

यावेळी पाचव्या मजल्यावरून तळमजल्यावर घेऊन जात असताना संदीपचा ऑक्सिजन संपल्याचे लक्षात आले. यानंतर डॉक्टरांनी दुसरा ऑक्सिजन सिलेंडर मागवला. परंतु रुग्णालयात ऑक्सिजन सिलेंडर शिल्लक नव्हता. अर्ध्या तासानंतर त्याला ऑक्सिजन लावण्यात आला. मात्र, तोपर्यंत संदीपचा मृत्यू झाला होता.

रात्री अकरा वाजल्यापासून संदीपचे सर्व नातेवाईक रुग्णालयात बसून आहेत. त्यांनी संदीपचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. याप्रकरणी संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले असता, पोलिसांनी तक्रार दाखल करून घेण्यास टाळटाळ करत असल्याचे संदीप याची बहीण अलका बनसोडे यांनी सांगितले.