पिंपरीतील गांधीनगरमध्ये चॉपरने एकाच्या तोंडावर वार

0
1151

पिंपरी, दि. १२ (पीसीबी) – मित्रासोबत भांडण करत असल्याच्या समजातून एका तरुणाने त्या इसमाच्या तोंडावर आणि नाकावर चॉपरने प्राणघातक वार करुन गंभीर जखमी केले. ही घटना शुक्रवार (दि.१०) रात्री सव्वाबाराच्या सुमारास पिंपरी गांधीनगर येथील कन्नडगल्लीतील काचेच्या दुकानासमोर घडली.

ज्वाला उर्फ उदय केदारसिंग गुरखा (वय २७, रा. गांधीनगर, पिंपरी) असे चॉपरचे वार होऊन गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दिपक विठ्ठल पवार (वय ३३, रा. गांधीनगर, पिंपरी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री सव्वाबाराच्या सुमारास फिर्यादी ज्वाला काही सामान आणण्यासाठी घरा बाहेर पडले होते. यावेळी कन्नडगल्लीतील काचेच्या दुकानासमोर त्याला त्यांचा ओळखीचा मित्र नागेश बाबुराव कांबळे हे भेटले. त्या दोघांमध्ये चर्चा सुरु असताना आरोपी दिपक पवार याला असे वाटले कि ज्वाला हे कांबळे यांना शिवीगाळ करत आहे. यावर दिपकने त्याच्या जवळील चॉपरने ज्वाला याच्या तोंडावर आणि नाकावर  प्राणघातक वार करुन गंभीर जखमी केले. याप्रकरणी आरोपी दिपक याला अटक करण्यात आली आहे. पोलीस हवालदार ठोगिरे तपास करत आहेत.