पिंपरी चिंचवड मध्ये आता भाजपाचे खरे नाही, यावेळी राष्ट्रवादीला मोठी संधी

0
883

पिंपरी, दि. ४ (पीसीबी) – राज्यातील महापालिका निवडणुका पुढच्याच महिन्यात होणार हे सर्वोच्च न्यायालयाने आज दिलेल्या आदेशामुळे जवळपास स्पष्ट आहे. अगोदर या निवडणुका सप्टेंबर- ऑक्टोंबरमध्ये होतील अशी शक्यता व्यक्त केली गेल्याने कार्यकर्ते गहाळ बसले होते. आता सर्व इच्छुकांची पळापळ सुरू झाली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील राजकिय परिस्थिती काय राहिल याचा थोडासा आढावा घेण्याचा प्रयत्न केला. शहर भाजपाटा सर्वात मोठा आधारस्तंभ असलेले आमदार लक्ष्मण जगताप हे स्वतः गेली महिनाभर रुग्णालयात अत्यवस्थ असल्याने भाजपा गर्भगळीत आहे. पक्षाचे शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांचा एकट्याचा हा घास नसल्याने पुढची परिस्थिती ओळखून अर्धे अधिक इच्छुक कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याने यावेळी भाजपाचे काही खरे दिसत नाही. दुसरीकडे २०१७ मध्ये सत्ता गेल्याने अक्षरशः पेटून उठलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने प्रभाग रचनेपासून संभाव्य उमेदवार डोळ्यासमोर ठेवून पूर्ण तयारी केल्याने यावेळी सत्तेसाठी त्यांना मोठी संधी आहे, असे प्रथमदर्शनी म्हणता येईल.

केंद्रात नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांची सत्ता असल्याने महापालिकेसाठी एक भक्कम पर्याय म्हणून लोकांनी राष्ट्रवादीच्या भ्रष्ट कारभाराला वैतागून भाजपाला संधी दिली.
अजित पवार यांची सलग २० वर्षे अक्षरशः एकहाती सत्ता शहरात होती ती २०१७ मध्ये भाजपाने नेस्तनाबूत केली. जास्तीत जास्त १४ नगरसेवक जिंकूण येण्याचे रेकॉर्ड असताना १२८ पैकी तब्बल ७७ नगरसेवक भाजपाचे जिंकले आणि ज्या राष्ट्रवादीचे संख्याबळ अपक्षांसह किमान ८० ते ९० च्या दरम्यान असायचे त्यांचे अवघे ३६ नगरसेवक जिंकले होते. भाजपाला हे घवघवीत यश पदरी पडले ते फक्त आणि फक्त आमदार लक्ष्मण जगताप यांच्यामुळे शक्य झाले. मोदी, फडणवीस यांचे नाव आणि आमदार जगताप यांची प्रचंड मोठी ताकद होती. भाजपा उमेदवारांना सर्वात मोठे आर्थिक पाठबळ आमदार जगताप यांचे होते म्हणून ते यश मिळाले होते. शहरातील प्रत्येक वार्डमधील कार्यकर्त्यांची वैयक्तीक ताकद व जनसंपर्क आणि त्या तुलनेत प्रतिस्पर्धी उमेदवाराची क्षमता याचा अचूक अंदाज फक्त आमदार जगताप यांनाच होता.जात, भाषा, धर्म निहाय किती मते कुठे आहेत याचेही गणित आमदार जगताप यांना तोंडपाठ होते. त्याचा मोठा फायदा भाजपाला झाला आणि अजित पवार यांना कधी नव्हे तो अत्यंत दारूण पराभव पाहण्याची वेळ आली.
महापालिकेत आमदार जगताप आणि आमदार लांडगे या दोघांनी मिळून पाच वर्षे सत्ता गाजवली. अभ्यास, राजकीय डावपेच याबाबत ३० वर्षांचा अनुभव असल्याने शहर भाजपाचे सर्वांगीन नेते म्हणून आमदार जगताप यांचीच छाप कायम राहिली. आमदार लांडगे यांनी आपले संपूर्ण लक्ष फक्त भोसरी विधानसभा मतदारसंघाकडे केंद्रीत केल्याने आजतागायत त्यांना आमदार जगताप यांची जागा घेता आलेली नाही. आमदार महेश लांडगे यांचा संपर्क, लोकप्रियता मोठी आहे, पण ती फक्त भोसरी परिघापूरती आहे. आता स्वतः आमदार जगताप हे अत्यंत गंभीर आजाराने रुग्णालयात चिंताजनक स्थितीत आहेत. त्यांचे कुटुंबियसुध्दा कायम सेवेत आहेत. वैद्यकीय पथक आमदार जगताप यांच्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहेत, पण परिस्थितीत अद्याप अपेक्षित सुधारणा होताना दिसत नाही. ज्यांच्यामुळे भाजपाची उमेदवारी मिळणार आणि निवडणूक जिंकणार अशा तयारीत असलेले आमदार जगताप यांचे समर्थकांना अंदाज आल्याने ते सर्व चिंताग्रस्त आहेत. भाजपातील जेष्ठांची तसेच इच्छुकांचीही अक्षरशः गाळण उडाली आहे. आगामी राजकिय समिकरणांचा अंदाज आल्याने भाजपाचे किमान ४२ वर नगरसेवक अजित पवार अजित गव्हाणे, योगेश बहल यांच्या संपर्कात असल्याने भाजपा सैरभैर झाला आहे.
आमदार जगताप यांचे धाकटे बंधू माजी नगरसेवक शंकर जगताप यांच्याकडे चिंचवड विधानसभा प्रभारी पदाची नियुक्ती कऱण्यामागे आगामी समिकरणे होती. प्रत्यक्षात त्यानंतरही संघटन बांधणीत कमतरता राहिली. आमदारांचे कार्य अखंड सुरू ठेवण्यासाठी शंकर यांच्याकडे काही अंशी जबाबदारी सुपूर्द करण्याचा निर्णय भाजपाने जाणीवपूर्वक घेतला. प्रत्यक्षात आमदार जगताप यांनी ज्या पद्धतीने सत्तेची मोट बांधली होती ते काम त्यांचे बंधू शंकर यांना जमेल का याबाबत भाजपामध्येच साशंकता आहे. शंकर जगताप यांना पिंपळे गुरवमधूनच मोठा विरोध असल्याने ते चिंचवड विधानसभा किंवा शहर भाजपाचे नेतृत्व कसे करु शकतील याबद्दलही मोठा संभ्रम आहे.
भाजपाचे शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांनी अब की बार १०० पार अशी घोषणा केली आहे. पिंपरी चिंचवड शहरात भाजपाचे ६ मंडल, ५५० पदाधिकाऱ्यांची संख्या, ३५३ शक्ती केंद्र प्रमुख आणि १३०८ बूथ प्रमुख कार्यरत आहेत. त्यातच ओबीसी आरक्षणाबाबत राज्य सरकारने फसवणूक केली आहे. अशा परिस्थितीत भाजपा पुन्हा नक्कीच सत्तेत येणार असल्याचा दावा आमदार लांडगे कर आहेत. वास्तवात त्यांच्याच भोसरी विधानसभा मतदारसंघातून वसंत बोराटे, रवि लांडगे यांच्यासारखे भाजपाचे निष्ठावंत नगरसेवक राष्ट्रवादीत गेले. शहरातील माया बारणे, चंदा लोखंडे, माजी विरोधी नेता संतोष बारणे, माजी नगरसेवक राजू लोखंडे हे भाजपा सोडून राष्ट्रवादीत गेले तुषार कामठे सारखा भाजपाच्या नगरसेवकानेही प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. बलाढ्य नगरसेवकांनीही भाजपाला घरचा आहेर देत पक्ष सोडणार असल्याचे संकेत दिले आहेत. अशा प्रकारे भाजपाला गळती लागली पण ती रोखण्यात आमदार लांडगे यांना अपयश आल्याने भाजपाचे खरे दिसत नाही.