पालकमंत्र्यांची बैठक प्रचंड उपस्थितीत होत असताना महापालिकेची सर्वसाधारणसभा `ऑनलाईन` का?

0
219

– जेष्ठ नगरसेविका सिमा सावळे यांचा महापौर माई ढोरे यांना रोखठोक सवाल

पिंपरी, दि. २० (पीसीबी) – जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यासह बहुसंख्य मंत्री, खासदार, आमदार, अधिकारी यांच्या प्रचंड उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बैठक ऑफलाईन होत असताना महापालिकेची सर्वसाधारण सभा ऑनलाईन कशासाठी असा रोखठोक सवाल जेष्ठ नगरसेविका सिमा सावळे यांनी आज महापौर माई ढारे यांना सर्वसाधारण सभेत जाहीरपणे केला. भाजपाच्या नगरसेविका श्रीमती अर्चना बारणे यांच्या निधनाबद्दल अनेक नगरसेवकांना आदरांजलीपर बोलायचे होते, पण ऑनलाईन सर्वसाधारण सभेमुळे अनेक सदस्यांना संधी न मिळाल्याने नाराजीचा सूर होता.

महापौर माई ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेची मासिक सभा श्रध्दांजली अर्पन करून तहकूब ठेवण्यात आली. यावेळी सिमा सावळे यांनी ऑनलाईन सभेबद्दल तीव्र शब्दांत नाराजी दर्शवत निषेध व्यक्त केला. सावळे म्हणाल्या, सभागृहातील एक तरूण महिला सदस्याचे निधन ही खूप दुःखद घटना आहे. आपल्या सहकारी नगरसेविकेबद्दल शोक व्यक्त करण्यासाठी ऑफलाईन सभा सुरू कऱण्याची बहुसंख्य सदस्यांची मागणी होती. त्याबाबत महापौरांचा आदेश नसल्याने प्रशासन आदेश काढत नव्हते. खरे तर, गेल्याच आठवड्यात उपमुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुणे कौन्सिल हॉलमध्ये विविध बैठका झाल्या. दोन-चार बैठकांना गर्दी होती. महापालिका आयुक्त स्वतः त्या बैठकांनी उपस्थित होते. तिथे त्या सर्व बैठका ऑफलाईन म्हणजेच थेट होत असताना, इथे कोरोनाचे निमित्त करून महापालिकेची सभा ऑनलाईन कशासाठी, असा मार्मिक सवाल सावळे यांनी उपस्थित केला. नगरसेवकांच्या प्रश्नांना सामोरे जायला नको म्हणून जाणीवपूर्वक सर्वसधारण सभा ऑनलाईन घेता, असा गंभीर आरोप करून हा पळपुटेपणा असल्याची टीका सावळे यांनी यावेळी केली. अन्य नगरसेवकांनीही त्यांच्या मतला दुजोरा दिला आणि महापौर माई ढोरे यांच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केली.