भाजपाची अब्रू वाचविण्यासाठीच दिवंगत नगरसेविकेचा मृत्यू डेंग्यूने नसल्याचे केले जाहिर

0
677

पिंपरी, दि. २० (पीसीबी) – महापालिकेतील सत्ताधारी भाजपाने आता कहर केला आहे. पक्षाच्या दिवंगत नगरसेविका अर्चना बारणे यांचा डेंग्यू च्या आजाराने मृत्यू झाला. खासगी रुग्णालय, रक्त तपासणी करणाऱ्या प्रयंगोशाळा आणि बाणेर च्या ज्युपिटर ह़ॉस्पटलने हा मृत्यू डेंग्यू मुळे असल्याचे म्हटले, पण महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्याने डेंग्यूने नसल्याचा खुलासा केला आहे. नगरसेविका मृत्यू डेंग्यूने झाल्याचा ठपका नको म्हणून केवळ पक्षाची अब्रू वाचविण्यासाठीच भाजपाने हा खटाटोप केल्याची चर्चा आता महापालिका वर्तुळात सुरू आहे.

थेरगाव प्रभागातील नगरसेविका अर्चना बारणे यांचा दहा दिवसांपूर्वी सर्व सोयिंनी युक्त अशा ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. हा मृत्यू डेंग्यूच्या आजाराने झाल्याचे त्याचवेळी जाहीर करण्यात आले. बारणे यांच्या नातेवाईकांनीही डेंग्यूचेच कारण सांगितले. महापालिकेतील सत्ताधारी भाजपाच्या नगरसेविकाचा डेंग्यूने मृत्यू होतो, म्हणजेच या शहरातील राज्यकर्ते सुस्त आहेत, प्रशासन झोपा काढते आहे, अशी खरमरीत टीका नागरिकांमधून सुरू झाली होती. डेंग्यूचा आजार किती पसरला आहे, याची गल्लोगल्ली चर्चा सुरू झाली होती. सत्ताधारी पक्षाच्या नेते, पदाधिकारी आणि त्यांच्या देशावर काम कऱणाऱ्या अधिकाऱ्यांवर त्याचे खापर फूटले. आगामी काळात हा निवडणूक प्रचाराचा मुद्दा होऊ शकतो, अशी भिती महापालिकेतील राज्यकर्त्यांना वाटली. त्यामुळे दोनच दिवसांत आरोग्य वैद्यकीय आधिकाऱ्यांनी एक जाहीर प्रसिध्दीपत्र काढून, श्रीमती बारणे यांचा मृत्यू डेंग्यू आजाराने झाला नाही, असा खुलासा माध्यमांकडे पाठविला. प्रशासनाचे ते प्रसिध्दीपत्र पाहून त्यावेळी सर्वांनाच धक्का बसला.

दरम्यान, आज (मंगळवारी) ऑनलाईन महापालिका सर्वसाधारण सभेत श्रीमती बारणे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. निधनाबद्दल नगरसेवकांनी आपल्या भाषणातून दुःख व्यक्त केले. नंतरच्या चर्चेत मृत्यू डेंग्यूने झाला नाही, हा प्रशासनाचा खुलासा किती भंपक आहे याबद्दल खेद व्यक्त केला. केवळ भाजपाची अब्रू वाचविण्यासाठीच असा खोटा रिपोर्ट तयार करून घेतल्याचा संशय काही नगरसेवकांनी व्यक्त केला.

श्रीमती बारणे यांना सुरवातीला खासगी रुग्णालयात दाखल केले, त्यावेळी डेंग्यूचे निदान झाले होते. नंतरच्या काळात चिंचवड येथील सातव लॅबमध्ये रक्ताची तपासणी केली असता त्यांनीसुध्दा डेंग्यूचेच कारण सांगितले. तब्बेत अधिक बिघडल्यावर बाणेर येथील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये दाखल केले तिथेही डेंग्यूच असल्याचे सांगितले. श्रीमती बारणे यांचे निधन झाले, त्यावेळी त्यांच्या नातेवाईकांनीसुध्दा डेंग्यूचेच कारण जाहीर केले. प्रत्यक्षात त्यानंतर दोन दिवसांनी महापालिकेने यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील प्रयोगशाळेच्या रिपोर्टचा हवाला देत डेंग्यू नसल्याचे प्रसिध्दीपत्रक काढले. श्रीमती बारणे यांच्या मृत्यूनंतर डेंग्यूच्या तपासणीसाठी महापालिकेला रक्ताचे नमुने कुठे मिळाले, असाही प्रश्न आता उपस्थित होतो आहे. सर्वच प्रकरण संशयास्पद असल्याने सत्ताधारी भाजपाबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जातो आहे.