पाण्यासाठी भीक मागण्याची वेळ माझ्यावर आली आहे; एकनाथ खडसेंची उद्विग्नता 

0
640

मुंबई, दि. २८ (पीसीबी) – राज्यात दुष्काळी परिस्थिती भीषण असताना सरकार याबाबत गंभीर नाही.  माझ्यावर पाण्यासाठी भीक मागण्याची वेळ आली आहे, अशी खंत भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी विधानसभेत दुष्काळावरील चर्चेदरम्यान व्यक्त केली. 

दुष्काळाशी सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज असणे आवश्यक आहे. मात्र, आज प्रशासनाकडे मनुष्यबळ कमी आहे. आमच्यासारखा माणूस ३ महिने पत्रव्यवहार करत आहे. माझी ही स्थिती आहे, तर सर्वसामान्य माणसांची काय अवस्था असेल.  हे सरकार दुष्काळाचा पोरखेळ तर करत नाही ना? असा  सवाल खडसे यांनी   केला.

माझ्या मतदार संघात ८१ गावामध्ये पाणी मिळत नाही. याबाबत मी सभापतींना पत्र देणार आहे. मला आता पायऱ्यांवर बसण्याची परवानगी द्या, अशी मागणीही त्यांनी  यावेळी केली. महसूलमंत्री चंद्रकात पाटील यांच्याकडून देखील  न्याय मिळत नाही. त्यामुळे जायचे कुठे? असा सवालही खडसे यांनी केला. माझ्या मतदार संघात पिण्याचे पाणी विकत घेण्याची वेळ येते, तेव्हा जनावरांची काय स्थिती असेल, याचा अंदाज लावा, अशा शब्दात खडसे यांनी संताप व्यक्त केला.