पाक संघ भारताला हरवू शकत नाही- हरभजन

0
515

लंडन, दि. ३ (पीसीबी) – वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघ १६ जूनला पाकिस्तान संघाशी भिडणार आहे. पण सरफराज अहमदच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पाकिस्तानकडे अनुभवाची कमतरता आहे. त्यामुळे भारताला पराभूत करणे अशक्य आहे, असा ठाम विश्वास भारताचा फिरकीपटू हरभजन सिंग याने व्यक्त केला.

पाकिस्तानचा संघ फार्मात नाही. त्यांच्याकडे तितका अनुभवही नाही. काही वर्षांपूर्वी पाकिस्तान संघाला पराभूत करणे कठीण होते. पण सध्याच्या संघाला भारत १० पैकी नऊ सामन्यांत पराभूत करू शकतो, असे हरभजन एका कार्यक्रमात म्हणाला. पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत भारतीय संघावर खूप दबाव असणार आहे, याकडेही त्याने लक्ष वेधले.

दोन्ही संघ मजबूत असतील तर त्यांना अपयशाची भीती असते. पाकिस्तानविरुद्ध पराभूत झाल्यास भारतात काय होते हे मला चांगलेच ठाऊक आहे. त्यामुळे भारतीय संघावर कायम दबाव असतो, असे हरभजन म्हणाला. इतर देशांविरुद्धचे सामने लोकांच्या फार लक्षातही राहत नाहीत. पण पाकिस्तानविरुद्धच्या लढतीतील प्रत्येक क्षण लक्षात राहतो. पाकिस्तानकडे गमावण्यासारखे काही नाही. भारताविरुद्ध त्यांनी विजय मिळवल्यास तो त्यांच्यासाठी बोनस ठरेल. पण भारत हरला तर ते आमच्यासाठी खूप वाईट असेल, असेही त्याने सांगितले.