पाकिस्तानपेक्षा चीन हा भारताचा मोठा शत्रू – शरद पवार

0
187

मुंबई, दि. १२ (पीसीबी) : पाकिस्तानपेक्षा चीन हा भारताचा मोठा शत्रू आहे, हे माझं मागील अनेक वर्षांपासूनचं मत आहे. लांब पल्ल्याच्या दृष्टीने विचार केल्यास आपल्या हितासंदर्भात खरं संकट निर्माण करण्याची ताकद, दृष्टी आणि कार्यक्रम फक्त चीनचा आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. यापूर्वी जॉर्ज फर्नांडीस यांनी देखील संरक्षण मंत्री असताना देखील चीन हा पाकिस्तानपेक्षा मोठा शत्रू असल्याचं म्हटलं होतं, तेव्हा त्यांच्यावर खूप टीका झाली होती.

शिवसेना नेते तथा खासदार आणि सामनाचे संपादक संजय राऊत यांनी शरद पवार यांची मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीत शरद पवार यांनी महाराष्ट्रातील ‘ठाकरे सरकार’ला अजिबात धोका नाही, असंही सांगितलं. ही मुलाखत 11, 12 आणि 13 जुलैला प्रसारित होत आहे. या मुलाखतीत लॉकडाऊन, कोरोना, चीनचे संकट, ढासळलेली अर्थव्यवस्था अशा सर्वच प्रश्नांवर शरद पवार यांनी संवाद साधला.

एका भागात संजय राऊत यांनी चीनच्या संदर्भात भूमिकेबद्दल विचारलं असता पवार म्हणाले की, चीन प्रश्नाकडे बघण्याचा माझा दृष्टीकोन वेगळा कारण सामान्यपणे आपला विरोधक कोण किंवा शत्रू कोण याचा विचार करतो तेव्हा भरतीय मनात पहिल्यांदा पाकिस्तान येतो. मागील अनेक वर्षांपासून माझं मत आहे की पाकिस्तानपासून आपल्याला खरी चिंता नाही. पाकिस्तान आपल्या विचाराचा नाही, तो आपल्या हिताच्याविरोधात पावलं टाकतो हेही खरं आहे. मात्र लांब पल्ल्याच्या दृष्टीने विचार केल्यास आपल्या हितासंदर्भात खरं संकट निर्माण करण्याची ताकद, दृष्टी आणि कार्यक्रम फक्त चीनचा आहे. चीन हे आपल्या देशासमोरील मोठं संकट आहे, असं पवार म्हणाले. पवार म्हणाले की, चीन हे संकट असल्याने चीनपासून आपल्या देशाला होणारा उपद्रव हा साधासुधा नाही. पाकिस्तानची लष्करी शक्ती आणि चीनची लष्करी शक्ती यांच्यात जमीन आसमाचा फरक आहे. यावेळी पवार म्हणाले, आज देशाला मनमोहन सिंग यांच्यासारख्या नेतृत्वाची गरज आहे. कारण मनमोहन सिंग जेव्हा पहिल्यांदा केंद्रीय अर्थमंत्री झाले. तेव्हा त्या मंत्रिमंडळात मी होतो. मला माहिती आहे, त्यावेळी आर्थिक अडचणीतून आम्ही कसे जात होतो. पण मनमोहन सिंग यांनी एक नवीन दिशा दिली. त्याला दोन कारण आहेत. मनमोहन सिंग यांच्यानंतर मी नरसिंहरावांना श्रेय देतो. कारण या दोघांनी नेहमीच्या चौकटीतला रस्ता बदलून वेगळ्या वळणावर गाडी नेली आणि संपूर्ण अर्थव्यवस्था सावरली. आज त्याची आवश्यकता होती. तशा प्रकारच्या लोकांची मदत घेऊन पंतप्रधान मोदी यांनी तशा दृष्टीनं पावलं टाकण्याची काळजी घ्यावी आणि त्या गोष्टींसाठी माझी खात्री आहे की, देश सहकार्य करेल, असंही पवार म्हणाले.