पहिली इंटरनेट कार, MG Hector साठी उद्यापासून बुकिंग सुरू

0
497

नवी दिल्ली, दि. ३ (पीसीबी) – प्रसिद्ध ब्रिटिश कार निर्माता कंपनी एमजी मोटर(मॉरिस गॅरेज)च्या Hector SUV साठी ४ जूनपासून अधिकृतपणे बुकिंग सुरू होत आहे. MG Motor India च्या अधिकृत संकेतस्थळावर दुपारी १२ वाजेपासून बुकिंग सुरू होणार आहे. कंपनीची ही भारतातील पहिलीच कार आहे. याशिवाय ही भारतातील पहिली ५० हून जास्त कनेक्टेड फीचर्स असलेली इंटरनेट कार असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

कंपनीने ‘आयस्मार्ट नेक्स्ट जेन’सह भारतात एक अभूतपूर्व असे तंत्रज्ञान सादर केले आहे. हे तंत्रज्ञान अनेक कंपन्यांच्या संयुक्त उपक्रमातून विकसित करण्यात आलं आहे. मायक्रोसॉफ्ट, अ‍ॅडोब, अनलिमिट, एसएपी, सिस्को, गाना, टॉम टॉम आणि न्यूआन्स यांसह इतर वैश्विक टेक भागीदारांच्या सशक्त संघटनेसह या कार निर्मात्या कंपनीने इंटरनेट-सक्षम कारची अनेक नवीन वैशिष्टय़े प्रस्तुत केली, जी एमजी हेक्टरमध्ये उपलब्ध असतील. ही भारतातील पहिली 48V हायब्रेड SUV आहे. यामध्ये कंपनीकडून १९ एक्सक्लुसिव्ह फीचर्स दिले आहेत. MG Hector मध्ये १०.४ इंचाची मोठी स्क्रीन देण्यात आली आहे. ही स्क्रीन तुम्ही रिमोटने देखील कंट्रोल करु शकतात. कारच्या आतमध्ये इंटरनेटची सेवा देण्यात आली आहे. सनरूफ, एलईडी हेडलाइट्स, क्रुज कंट्रोल, अॅडजस्टेबल सीट्स यासह ३६० डिग्री कॅमेरा देखील देण्यात आला आहे.

एमजी हेक्टरमध्ये व्हॉइस असिस्टची सुविधा असणार आहे. क्लाउड आणि हेड युनिटवर चालणारी ही सुविधा न्यूआन्सने भारतासाठी विकसित केली असून भारतीयांचे उच्चार ओळखण्यासाठी ती तयार केली आहे. हे व्हॉइस असिस्ट ‘हॅलो एमजी’ म्हटल्याने सक्रिय होते. ही यंत्रणा खिडक्या आणि सन-रूफ उघडणे किंवा बंद करणे, वातानुकूलन यंत्रणा, नेव्हिगेशन इत्यादीचे नियंत्रण करते आहे. आयस्मार्ट नेक्स्ट जेन हे आयस्मार्ट मोबाइल अ‍ॅपद्वारे वापरता येणार आहे. यातील अनेक सुविधांचा भारतात प्रथमच वापर केला जाणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे. प्रत्येक वेळी अ‍ॅप सुरू केल्यानंतर मोटार स्कॅन केली जाते आणि मोटारीचे स्थान, टायरमधील हवेचा दाब, दरवाजे बंद आहेत की नाही आहे, अशा प्रकारची माहिती दिली जाते. दरवाजे लॉक किंवा अनलॉक करण्यासाठी, इग्निशन सुरू करण्यासाठी आणि वातानुकूलन यंत्रणा सुरू करण्यासाठी हे रिमोट अ‍ॅप वापरू शकतात.