पश्चिम रेल्वेवर १२० तर मध्य रेल्वेवर २०० फेऱ्यांचे नियोजन; सर्वसामान्य प्रवशांना बंदी कायम

0
321

मुंबई : दि १५(पीसीबी): गेल्या अडीच महिन्यांपासून बंद असलेली मुंबईची जीवनवाहिनी उपनगरी रेल्वेसेवा आजपासून पुन्हा रुळावर येणार आहे. मुंबई महानगर परिसरातून कामानिमित्त ये-जा करणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकलगाडय़ा चालवण्यावर रेल्वे मंत्रालय आणि राज्य सरकारचे एकमत झाले. याबाबतची सज्जताही रेल्वेने सुरू केली असून पश्चिम रेल्वेवर १२० तर मध्य रेल्वेवरील तिन्ही मार्गावर २०० लोकल फेऱ्या चालवण्याचे नियोजन आखण्यात आले आहे. मात्र, या गाडय़ांमध्ये सर्वसामान्य नागरिक वा नोकरदारांना प्रवेश दिला जाणार नाही.

सध्या मुंबई महानगर परिसरात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी बेस्ट आणि एसटी धावत आहेत. मात्र टाळेबंदीत शिथिलता आणल्यानंतर खासगी कार्यालय व अन्य प्रवाशांनाही प्रवेश दिल्यानंतर या दोन्ही सेवांना प्रचंड गर्दी होऊ लागली आहे. यांमुळे करोनाचा प्रसार होण्याचा धोकाही वाढला आहे. या पाश्र्वभूमीवर अत्यावश्यक सेवांतील कर्मचाऱ्यांसाठी लोकलसेवा सुरू करण्याच्या राज्य सरकारच्या मागणीला जोर चढला आहे. त्याकरिता गेल्या काही दिवसांत राज्य सरकारी यंत्रणा आणि रेल्वे तसेच पोलीस, पालिका प्रशासनाच्या बैठकाही झाल्या व लोकलसेवा सुरू करण्यावर एकमत झाले.
लोकलसेवा १५ जूनपासून सुरू करण्यात येणार असल्याची चर्चा शनिवारपासून होती. मात्र, लोकल सुरू करण्यासंदर्भात अद्याप कोणतीही तारीख निश्चित नसल्याचे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी सांगितले. रेल्वे बोर्डाकडून आदेश येताच लोकलसेवा तात्काळ सुरू करण्याच्या दृष्टीने नियोजन केले असल्याचेही ते म्हणाले. पश्चिम रेल्वेकडून चर्चगेट ते विरार, डहाणू अप व डाऊन दोन्ही मार्गावर १२० लोकल फे ऱ्या चालवण्याचे वेळापत्रक आखण्यात आले आहे, असे ते म्हणाले. दरम्यान, मध्य रेल्वेचेही वेळापत्रक तयार करण्याचे काम रविवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेवरील मुख्य, हार्बर आणि ट्रान्सहार्बर या मार्गावर मिळून २०० लोकलफेऱ्या चालवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

प्रवेश कोणाला?
’आतापर्यंतच्या नियोजनानुसार या लोकलगाडय़ांमधून केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या प्रवासालाच परवानगी असेल. या कर्मचाऱ्यांना रेल्वेस्थानकातून तिकीट देण्यात येणार नाही.
’त्याऐवजी त्यांना क्यूआरकोड असलेले कार्ड देण्यात येईल. स्थानकात प्रवेश करण्यापूर्वी हे कार्ड स्कॅन करावे लागेल. अशा कर्मचाऱ्यांची यादी राज्य सरकार, पालिका व पोलीस रेल्वेला देणार असून त्यानुसार स्मार्ट कार्डचे वाटप रेल्वेकडून होईल.
’ कार्ड वाटप करण्यास विलंब होणार असल्याने कर्मचाऱ्यांच्या ओळखपत्रावरच स्थानकात प्रवेश दिला जाणार आहे.
पहिली लोकल विरारमधून : पश्चिम रेल्वेवर सकाळी ५.३० वाजल्यापासून विरार आणि चर्चगेट स्थानकातून लोकल सुरू होतील. दर १५ मिनिटांनी लोकल धावतील. डहाणू विरारहून सुटणाऱ्या लोकल अंधेरीपर्यंत धीम्या असतील. त्यानंतर चर्चगेटपर्यंत जलद धावतील. चर्चगेटहून सुटताना या लोकल अंधेरी आणि बोरीवलीपर्यंत जलद जातील व त्यानंतर धीम्या होतील.