पवना नदिच्या पलिकडे चिंचवड-वाकड-हिंजवडी चौथ्या महापालिकेची चर्चा

0
839

पिंपरी, दि. १३ (पीसीबी) – पुणे शहराचा वाढता पसारा पाहता हडपसर-वाघोली अशी तिसरी महापालिका अस्तित्वात येण्याच्या दृष्टीने सरकारची पावले पडत आहेत. आता शेजारील पिंपरी चिंचवड महापालिकेचे विभाजन करून चिंचवड-वाकड-हिंजवडी अशी जिल्ह्यातील चौथी महापालिका निर्माण करण्याचीही चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी छोट्या महापालिका असणे योग्य असल्याचे विधान पुणे शहरात केल्याने या माहितीला पुष्ठी मिळत आहे. देहू, आळंदी, चाकण, तळेगाव परिसराचा वेगाने होणारा अनियंत्रीत विकास पाहता हा परिसर आताच्या पिंपरी- चिंचवड महापालिकेत समाविष्ट करण्याचेही घाटत आहे. दरम्यान, सार्वत्रिक निवडणुकीत पुन्हा सत्तेवर येण्यासाठी भाजपची ही व्युहरचना असून आगामा महापालिका निवडणुकिपूर्वीच त्याबाबत निर्णय जाहीर करण्याचा शिंदे-फडणवीस सरकारचा पयत्न असल्याचे समजले.

पिंपरी चिंचवड शहराची सद्याची लोकसंख्या ३० लाखाच्या दरम्यान आहे. शहरालगतच्या अनेक गावांना रस्ते, पाणी आदी सुविधा महापालिकेच्या खर्चातून पुरविल्या जातात. हद्दीबाहेर सुविधा द्यायच्या मात्र त्या गावांचा महसूल ग्रामपंचायतींकडे जमा होतो. त्यापेक्षा ही गावेच शहरात समाविष्ट करून सेवा सुविधा दिल्या तर अधिक योग्य होईल, असा मतप्रवाह आहे. फेब्रुवारी २०१५ मध्ये शहरालगतचे हिंजवडी, माण, मारुंजी, नेरे, जांबे, गहुंजे, कासारसाई ही सात गावे महापालिकेत विलीन करून घेण्याचा ठराव पिंपरी चिंचवड महापालिका सभेने मंजूर केला. राष्ट्रवादी बहुल मतदार असल्याने या गावांचा समावेश करण्याचा निर्णय अखेर पर्यंत होऊ शकला नाही. आता पुन्हा हा विषय चर्चेत आला आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा महापालिकेत सत्तेत यायचे तर या सात गावांचा समावेश भाजपच्या अंगलट येऊ शकतो. त्यापेक्षा हडपसर-वाघोली नवीन महापालिकेसाठी जसा प्रस्ताव तयार करण्याच्या हालचाली सुरू आहेत त्याच पध्दतीने हिंजवडी-माण चा शहरात समावेश करण्यापेक्षा चौथ्या महापालिका निर्मितीचा विचार सुरू आहे. चिंचवड-वाकड या आयटी बहुल मतदारांचा कल भाजपच्या बाजुने असतो, त्यामुळे हा भाग जोडून चौथी महापालिका निर्माण केली तर तिथेही भाजपची सत्ता शक्य आहे.

पिंपरी चिंचवड शहराची अशा प्रकारे फाळणी करायची आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे कार्यक्षेत्र असलेला पवना नदिच्या पलिकडचा भाग या नवीन महापालिकेत घ्यायचा. त्यात चिंचवडगाव, थेरगाव, वाकड, रहाटणी, पिंपळे सौदागर, पिंपळे निलख, पुनावळे, ताथवडे, वाल्हेकरवाडी, किवळे, मामुर्डी या भागाचा समावेश करायचा. दुसरीकडे पवना नदिच्या पुर्वेकडील भाग हा आता अस्तित्वात असलेल्या महापालिकेत कायम ठेवायचा. पिंपरी राखीव विधानसभा मतदारसंघातील दापोडी, फुगेवाडी, कासारवाडी, नाशिकफाटा, संत तुकारामनगर, पिंपरी स्टेशन, चिंचवड स्टेशन, आकुर्डी, निगडी, शाहुनगर, संभाजीनगर, एमआयडीसी, नेहरूनगर तसेच भोसरी विधानसभा कार्यक्षेत्रासह इंद्रायणी नदिच्या पलिकडचे देहू, आळंदी, चाकण, निघोजे, मोई या भागाची मिळून पिंपरी-भोसरी-देहू-आळंदी अशी महापालिका करायची असाही विचार सुरू आहे. चिंचवडमध्ये आमदार अश्विनी जगताप आणि भोसरीमध्ये आमदार महेश लांडगे यांच्या विधानसभा मतदारसंघात भाजपचा प्रभाव कायम आहे. त्याचा फायदा घेऊन या भागातील सत्ता कायम ठेवायची अशी भाजपची व्युहरचना आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत मावळ आणि शिरुर लोकसभा जागा काढायचीच, असा भाजपचा निर्धार आहे. त्याशिवाय राष्ट्रवादी आणि पवार काका पुतण्यांची पुणे शहर, जिल्हा आणि पिंपरी चिंचवडमधील मक्तेदारी कायमची मोडीत काढायची त्यासाठी हा खटाटोप सुरू आहे, असेही सांगण्यात आले.