पदक भेटले खरे पण आता सामना कोरोनाशी!

0
187

नवी दिल्ली,दि.३१(पीसीबी) – भारतीय बॉक्सिंग संघाला इस्तंबूल येथील सराव स्पर्धेत दोन ब्रॉंझपदकांवर समाधान मानावे लागले. यामध्ये निखत झरीन (५१ किलो) आणि गौरव सोळंकी (५७ किलो) यांचा समावेश आहे. मात्र, गौरवसह अन्य पाच भारतीयांना या स्पर्धे दरम्यान करोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे वृत्त आहे.

संसर्ग झालेल्या खेळाडूंमध्ये गौरव सोळंकी , ब्रिजेश यादव (८१ किलो), दुर्योधन नेगी (६९ किलो) या तिघांसह संघ प्रशिक्षक धरमेश्वर यादव , व्हिडियो अॅनॅलिस्ट आणि फिजिओ यांचाही समावेश आहे. या सर्वांची दुसऱ्यांदा चाचणी घेण्यात आली असून, या चाचणीत्या अहवालावर त्यांचे मायदेशी परतणे अवलंबून राहणार आहे. या चाचणीत ज्यांचा अहवाल निगेटिव्ह येईल, त्यांनाच मायदेशी परतण्याची परवानगी मिळणार आहे. या सर्वांना सध्या विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

भारतीय बॉक्सर पॉझिटिव्ह सापडून आठवडा झाला आहे. आता त्यांची दुसऱ्यांदा चाचणी घेण्यात आली आहे. सर्व संघ व्यवस्थापनाचे त्यांच्या उत्तराकडे लक्ष लागून राहिले आहे. या दौऱ्यात ललित प्रसाद (५२ किलो), शिवा थापा (६३ किलो), दुर्योधन सिंग नेही (६९ किलो),नमन तन्वर (९१ किलो) आणि कृ्ष्णन शर्मा (९१ किलो वरील) सोनिया लॅथर (५७ किलो), परवीन (६० किलो), ज्योती ग्रेवाल (६९ किलो), पूजा सैनी (७५ किलो) या अन्य खेळाडूंचा समावेश होता. पण, यापैकी एकालाही पदकाच्या शर्यतीत राहता आले नाही.

या सर्व खेळाडूंची आणखी एका करोना चाचणी होणार असून, त्यांना अजून एक आठवडा तेथेच रहावे लागणार आहे.