‘हे’ आहेत मराठीतील पहिले श्रेष्ठ संगीत नाटककार ज्यांनी….

0
528

पिंपरी, दि.३१ (पीसीबी) : आज मराठीतील पहिले श्रेष्ठ संगीत नाटककार. अण्णासाहेब किर्लोस्कर , अर्थात आदरणीय श्री.बळवंत पांडुरंग किर्लोस्कर यांची जयंती. त्यांना विनम्र अभिवादन .

त्यांचा जन्म ३१ मार्च १८४३ रोजी धारवाड जिल्ह्यात गुर्लहोसूर या गावी झाला. वयाच्या बाराव्या वर्षांपर्यंत कानडी व मराठी भाषेचा अभ्यास त्यांनी घरीच केला. नंतर कोल्हापूर व धारवाड येथे शिक्षणासाठी राहून मुलकी परीक्षेपर्यंत ते शिकले. त्यापुढील शिक्षणासाठी पुण्यास असताना त्यांना नाटकांची आवड निर्माण झाली व ते नाटक मंडळ्यांस पदे रचून देऊ लागले. स्वतःची नाटक मंडळी काढून त्यांनी काही नाटकेही केली. तथापि ही नाटक मंडळी मोडली आणि ते गुर्लहोसूर येथे येऊन राहिले. त्यानंतर त्यांनी वकिलीची परीक्षा देण्याचा प्रयत्न केला पण तो यशस्वी न झाल्यामुळे ते नोकरी करू लागले. शिक्षक, जमादार आणि महसूल आयुक्तांच्या कचेरीतील कर्मचारी अशा विविध प्रकारच्या नोकर्‍या त्यांनी केल्या. अण्णासाहेबांनी प्रारंभी ‘अल्लाउद्दिनाची चितुडगडावरील स्वारी’ हे नाटक लिहावयास घेतले होते ते अपुरेच राहिले. शिक्षक असताना शांकरदिग्जय हे गद्य नाटक त्यांनी लिहिले.