पंतप्रधान मोदींची संपत्ती किती? घ्या जाणून

0
572

नवी दिल्ली, दि. २६ (पीसीबी) – वाराणसीतून पंतप्रधान मोदी यांनी आपला उमेदवारी अर्ज आज (शुक्रवार) दाखल केला. अर्जासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रात मोदी यांनी आपल्या संपत्तीची माहिती नमूद केली आहे.  मोदी यांच्याकडे फिक्स डिपॉझिटच्या स्वरुपात जास्त चल संपत्ती आहे. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नरेंद्र मोदी यांचे १.२७ कोटी रुपये फिक्स डिपॉझिटमध्ये आहेत.

मोदी यांच्याकडे एकूण संपत्ती २.५१ कोटी रुपये आहे. चल संपत्ती १.४१ कोटी रुपये आणि अचल संपत्ती १.१० कोटी रुपये आहे. २०१४ च्या तुलनेत मोदींच्या चल संपत्तीमध्ये ११४.१५ टक्के वाढ झाली आहे. २०१४ साली मोदींनी पहिल्यांदा वाराणसीमधून लोकसभेची निवडणूक लढवली होती. २०१४ साली मोदींकडे ६५.९१ लाख चल संपत्ती होती. सरकारी वेतन आणि बचतीवर मिळणारे व्याज हे नरेंद्र मोदींचे उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत आहे.

मोदींच्या विरोधात कुठलाही गुन्हेगारी आरोप नाही, असे प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रात नमूद केलेली संपत्ती तीन प्रकारात मोडते. चल, अचल आणि देणी असे वर्गीकरण केले जाते. ३१ मार्च २०१९ रोजी मोदींकडे ३८,७५० रुपये रोकडमध्ये उपलब्ध होते. मोदी यांच्याकडे ४,१४३ रुपये बँक बॅलन्स असून १.२७ कोटी रुपये फिक्स डिपॉझिटमध्ये आहेत. २०१४ साली मोदींकडे ३२ हजार ७०० रुपये रोकडमध्ये उपलब्ध होते. २६.०५ लाख रुपये बँक बॅलन्स होता आणि फिक्स डिपॉझिटमध्ये ३२.४८ लाख रुपये होते. २०१९ लोकसभा निवडणुकीसाठी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार नरेंद्र मोदींनी २० हजार रुपये बाँडमध्ये गुंतवले आहेत. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रात ७.६१ लाख रुपये आणि लाईफ इन्शुरन्समध्ये १.९० लाख रुपये आहेत.

मोदींकडे ४५ ग्रॅम वजनाच्या चार सोन्याच्या अंगठया आहेत. ३१ मार्च २०१९ च्या  बाजारभावानुसार त्याची किंमत १ लाख १३ हजार ८०० रुपये आहे. २०१४ साली त्या अंगठयांची किंमत १.३५ लाख रुपये होती.  मोदींचे  कुठलेही कर्ज नाही. दिल्ली विद्यापीठातून मोदींनी १९७८ साली पदवी मिळवली आहे. तर १९८३ साली अहमदाबादच्या गुजरात विद्यापीठातून  पदव्युत्तर पदवी संपादन केली आहे.