बलात्कार प्रकरणात नारायण साई दोषी; सूरत सत्र न्यायालय ३० एप्रिला शिक्षा सुनावणार

0
509

सुरत, दि. २६ (पीसीबी) – बलात्कार प्रकरणात आसाराम बापूचा मुलगा नारायण साईला सूरत सत्र न्यायालयाने दोषी ठरवले आहे.  सुरतच्या जहांगीरपुरा आश्रमातील साधिकेने नारायण साईवर बलात्काराचे आरोप केले होते, ज्यानंतर साधिकेचा जबाब आणि घटनास्थळावरुन मिळालेल्या पुराव्यांच्या आधारावर नारायण साईविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सूरत सत्र न्यायालयाने नारायण साईच्या शिक्षेची सुनावणी ३० एप्रिला होणार असल्याची माहिती दिली आहे.

२०१३ मध्ये नारायण साईवर बलात्काराचा गुन्हा दाखल होताच, तो भूमिगत झाला. पोलिसांपासून वाचण्यासाठी तो सातत्याने आपले ठिकाण बदलत होता. सुरतचे तत्कालीन पोलिस आयुक्त राकेश अस्थाना यांनी नारायण साई यांना अटक करण्यासाठी ५८ विविध पथके बनवून शोध सुरु केला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर सुमारे दोन महिन्यानंतर ४ डिसेंबर, २०१३ मध्ये नारायण साईला हरियाणा-दिल्ली सीमाजवळ अटक करण्यात आली. साधिकेने आपल्या जबाबात नारायण साईविरोधात सबळ पुरावे दिले होते. नारायण साईविरोधात कोर्टाने आतापर्यंत ५३ साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत. त्यापैकी काहींनी या दोन्ही बहिणींवर अत्याचार करताना पाहिल्याचे म्हटले आहे. तर ज्यांनी या कृत्यात आरोपींची मदत केली होती, ते आता साक्षीदार बनले आहेत.