पंचगंगेच्या पात्रात सापडले मगरीचे पिल्लू

0
332

शिंगणापुर (ता.करवीर), दि. २३ (पीसीबी) – येथील पंचगंगा नदीत मगरीचा वावर असल्याची गेली महिनाभर ग्रामस्थांत चर्चा होती. आज शुक्रवारी सकाळी नदीपात्रात काही शेतकऱ्यांना पुन्हा मगरीच्या पिलाचे दर्शन झाल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन व वन खात्याचे सहकार्याने मगर पकडण्यात यश आले. नदीपात्रातील पाणी, चिखल , गाळ अशा परिस्थितीत तब्बल सहा तास शर्थीचे प्रयत्न करून ही मगर पकडल्यानंतर उपस्थित ग्रामस्थांनी टाळ्या वाजवून आपत्ती व्यवस्थापन व वन खात्याच्या कर्मचाऱ्यांचे आभार मानले.

शिंगणापूर नदीपात्रात मगर असल्याची कुणकुण ग्रामस्थांना लागली होती. शिंगणापूर ते शुक्रवार पेठ, कोल्हापूर या मार्गावर नदीकाठी रेवाटी परिसरातील वरुटे मळी येथे पाण्याच्या डोहामध्ये मगरीचे वास्तव्य असल्याचे काही शेतकऱ्यांना ती निदर्शनास आली होती. मगरीची लहान दोन – तीन पिल्ले काठावर गवताच्या ठिकाणी येत असल्याचे बोलले जायचे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये एक प्रकारची धास्ती निर्माण झाली होती. आज पुन्हा सकाळी काही शेतकऱ्यांना मगरीचे पिलू नदीपात्रात दिसून येताच त्यांनी बाबतची माहिती जिल्हा परिषद सदस्या रसिका पाटील व पती अमर पाटील यांना कळवली. त्यांनी तात्काळ प्रशासनाला माहिती देताच प्रांताधिकारी वैभव नाऊडकर यांच्या मार्गदर्शनाखाली वन खात्याची व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली.

मगर असलेल्या ठिकाणी नादीपात्रात डोह असल्याने पाणी उपसा करण्यासाठी दिवसभर चार डिझेल इंजिनच्या वापरण्यात आले. पाणी उपसा आणि मगरीचा शोध दिवसभर सुरू होता. अखेर सहा तासानंतर पाणी कमी कमी झाल्यावर डोहात मगर दिसू लागली. गाळाने माखलेल्या या डोहात धैर्याने आपत्ती व्यवस्थापनाचे शुभम काटकर, कृष्णात सोरटे ,सिद्धार्थ पाटील या तरुणांनी धाव घेत चपळाईने मगरीला पकडले.
यावेळी वन खात्याच्या वतीने पकडण्यात आलेली मगर ही साडेतीन फुटाची व सुमारे १५ किलो वजनाचे पिल्लू असल्याचे सांगण्यात आले. तसेच पकडलेल्या मगरीला मगरींचा अधिवास असलेल्या ठिकाणी सोडण्यात येणार असल्याचे सांगितले.