पिंपरी चिंचवड मधून ७५० मजूर यूपी, एमपी, बिहारला रवाना

0
331

पिंपरी,दि. २३ (पीसीबी) – कोरोनाच्या भितीने बहुतांशी परप्रांतीय मजुर इथे थांबायला तयार नाहीत, ते आपापल्या गावाला जायचेच म्हणतात. पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातून आजवर सुमारे पाच लाख मजूर गावाला गेले. चिखली, कुदळवाडी, मोरेवस्ती, दिघी या भागात छोटे मोठे काम करणारे सुमारे ७५० कामगार आज दुपारी भोसरी येथून रवाना झाले. सर्वजण उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहारला जाणारे होते.

पुणे, मुंबई, ठाणे, औरंगाबाद, कोल्हापूर, सोलापूर, रत्नागिरी या औद्यागिक पट्ट्यात काम कऱणारे लाखो मजूर आपापल्या मूळ गावी रवाना होत आहेत. शहरात रोजगार मिळतो म्हणून कुटुंबासह असंख्य कामगार महाराष्ट्रात स्थिरस्थावर झाले होते. कोरोनाटी टाळेबंदी वाढत चालल्याने त्यांना हाताला काम नाही आणि आता पगार मिळणेही बंद झाले. त्यामुळे खायचे वांदे झाले. त्यामुळे जो तो आपापल्या गावाकडे जातो आहे. पिंपरी चिंचवड शहरात लघुउद्योग तसेच बांधकाम, स्क्रॅप व्यवसायात या कामगारांची संख्या मोठी आहे. आजवर टाळेबंदीमुळे कसेबसे तग धरून राहिलेले कामगारही आता निघून चाललेले दिसतात.

गावाला जाण्यासाठी भोसरी उड्डाण पुलाच्या खाली ७५० कामगार सहकुटुंब जमा झाले होते. सर्वांनी पोलिसांकडून रितसर परवानगी घेतली होती. त्याची पडताळणी करून त्यांना बसमध्ये प्रवेश देण्यात आला. भोसरी ते पुणे रेल्वे स्टेशन पर्यंत जाण्यासाठी ५६ पीएमपी बसेस खास या कामगारांसाठी तैनात केल्या होत्या. रांगेत उभ्या असलेल्या एका बसमध्ये एका सिटवर एक या प्रमाणे २० कामगार बसले की बस पुणे रेल्वे स्टेशनला रवाना होत असे. हजार किलोमीटरचा प्रवास करायचा असताना या कामगारांकडे खाण्यासाठी पदार्थ नव्हते, शासकीय स्तरावरही त्यांची कोणतीही जेवणाची व्यवस्था केलेली नव्हती. या कुटुंबांची अत्यंत केविलवाणी परिस्थिती होती. परत गेलेले हे कामगार किमान सहा महिने परत येण्याची शक्यता नसल्याचे त्यांच्याशी केलेल्या चर्चेतून जाणवले.
दरम्यान, कामगार निघून गेल्याने पिंपरी चिंचवड शहरातील उद्योजकांना या आता मजुरांची कमतरता जाणवते आहे. अर्धे अधिक कारखाने मजुरांअभावी सुरू होऊ शकलेले नाहीत, असे सांगण्यात आले.