पंकजा मुंडेंचा नवा गट?; गोपीनाथ गडावर होणार शक्तीप्रदर्शन

0
441

महाराष्ट्र, दि.३ (पीसीबी) – भाजपाच्या नेत्या आणि राज्याच्या माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी फेसबुकवर पोस्ट टाकल्यानंतर भाजपातील सुंदोपसुंदी बाहेर येऊ लागली आहे. पुढे काय करायचे याचा विचार करण्यासाठी वेळ द्या आणि १२ डिसेंबरला आपण निर्णय सांगू असे पंकजा म्हणाल्या आहेत. विशेषतः भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पंकजा मुंडेंच्या पराभवामागे पक्षातील लोक असल्याचा दावा केला आहे. दोघांच्याबरोबर आता माजी प्रकाश मेहताही नाराज असून, खडसे आणि मेहता गोपीनाथ गडावर हजर राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पंकजांच्या नेतृत्वाखाली नवा गट उदयास येण्याची शक्यता आहे.

सत्तेवरून पायउतार झालेल्या भाजपातील काही नेते बंडाचे हाती घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू होती. भाजपाच्या राज्यातील नेतृत्वावर ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्याकडूनही अनेकवेळा टीका झाली आहे. मात्र, स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आणि माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी फेसबुकवर पोस्ट टाकल्यानंतर भाजपात सर्वकाही आलबेल नसल्याची चर्चा सुरू झाली आहे. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी पंकजाच नाही, तर अनेक नेते संपर्कात असल्याचे सांगितल्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पत्रकार परिषद घेऊन “पंकजा मुंडे असा काही निर्णय घेणार नाही,” असा खुलासा करावा लागला.