नोटाबंदीपेक्षा मोठा घोटाळा आजपर्यंत देशाच्या इतिहासात झालेला नाही – राहुल गांधी

517

भोपाळ, दि. १६ (पीसीबी) – छत्तीसगड आणि मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीमुळे सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. एकीकडे छत्तीसगडमधील अंबिकापूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रचारसभेदरम्यान काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. तर दुसरीकडे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी मध्य प्रदेशातील देवरी सागर येथे थेट नरेंद्र मोदीवर टीका केली. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा नरेंद्र मोदींनी दोन कोटी लोकांना रोजगार देण्याचे आश्वासन दिल्याची आठवण करुन दिली. चीन सरकार २४ तासात ५० हजार तरुणांना रोजगार देत आहे. मेक इन इंडिया आणि स्टार्टअप इंडियासारख्या मोहिमेतून मोदी सरकार २४ तासात फक्त ४५० जणांना रोजगार देण्यात यशस्वी होत आहे असे राहुल गांधींनी सांगितले आहे.

‘नरेंद्र मोदी येतात आणि १५ लाखाचे आश्वासन देतात. दोन कोटी तरुणांना रोजगार देण्याचे आश्वासन देतील. पण आपल्या भाषणात गेल्या साडे चार वर्षात किती तरुणांना रोजगार दिला यासंबंधी एकही शब्द उच्चारणार नाहीत. मध्य प्रदेश आणि केंद्र सरकारने किती जणांना रोजगार दिला आहे….कोणालाच नाही’, अशी टीका राहुल गांधींनी केली आहे.

पुढे ते म्हणाले की, ‘नरेंद्र मोदींनी गेल्या साडे चार वर्षात देशातील श्रीमंतांचे तीन लाख ५० हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ केले आहे. मनरेगा चालवण्यासाठी ३३ हजार कोटी रुपये लागतात, पण मोदींनी त्याच्या १० टक्के पैसे आपल्या निवडक व्यवसायिकांना दिले आहेत’.