‘नॉटी’ पुरूषांच्या आचार विचारांची घाण फ्लश करून महाराष्ट्र स्वच्छ करायला मदत करा म्हणतात…

0
267

मुंबई, दि. १९ (पीसीबी) : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पुन्हा एकदा शिवसेना नेते संजय राऊत यांना डिवचले आहे. अमृता फडणवीस यांनी गुरुवारी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून #InternationalMensDay2020 आणि #WorldToiletDay2020 निमित्त एक मेसेज केला. यामध्ये अमृता फडणवीस यांनी संजय राऊतांना त्यांच्याच एका आक्षेपार्ह वक्तव्यावरुन अप्रत्यक्षपणे लक्ष्य केले.

आज आंतरराष्ट्रीय पुरूष दिवस आहे आणि जागतिक शौचालय दिनही आहे. यानिमित्ताने मी देशातील सर्व राष्ट्रभक्त पुरुषांना एक सर्वसामान्य स्त्री म्हणून आवाहन करते की, आपण सगळ्यांनी एकत्र येऊन वाईट विचारांच्या काही मोजक्या ‘नॉटी’ पुरूषांच्या आचार विचारांची घाण फ्लश करून महाराष्ट्र स्वच्छ करण्यासाठी मदत करावी, असे अमृता फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्याचा रोख संजय राऊत यांच्या दिशेने असल्याची चर्चा आहे.

काय आहे नेमका वाद?
शिवसेना नेते संजय राऊत यांनी मध्यंतरी अभिनेत्री कंगना रानौत हिच्यावर टीका केली होती. त्यावेळी संजय राऊत यांनी कंगनाला ‘हरामखोर’, असे संबोधले होते. यावरुन बराच गदारोळ झाल्यानंतर संजय राऊत यांनी सारवासारव केली होती. मला कंगनाला Naughty Girl नॉटी गर्ल म्हणायचे होते, असे संजय राऊत यांनी म्हटले होते.