निवडणूक आयोगाला धनुष्यबाण आम्हालाच द्यावा लागेल – एकनाथ शिंदे

0
245

मुंबई,दि.११(पीसीबी) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या गटांमध्ये सुरु असणाऱ्या वादाच्या पार्श्वभूमीवर अंधेरी पोटनिवडणुकीआधी शिवसेना पक्षनाव आणि चिन्ह गोठविल्यानंतर सोमवारी निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटासाठी नव्या नावांचे वाटप केले. उद्धव ठाकरे गटाला ‘शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)’ हे नाव मिळाले तर, शिंदे गटाच्या ‘बाळासाहेबांची शिवसेना’ या पर्यायी नावाला मान्यता देण्यात आली. ठाकरे गटाला ‘धगधगती मशाल’ हे चिन्ह देण्यात आले आहे. मात्र शिंदे गटाला आज सकाळी १० वाजेपर्यंत तीन नव्या चिन्हांचे पर्याय सुचवण्यासाठी अवधी देण्यात आला आहे. असं असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मेरीटच्या आधारावर धनुष्यबाण चिन्ह आम्हालाच मिळायला हवं असा दावा केला आहे.

मुख्यमंत्री शिंदेंनी प्रसारमाध्यमांशी रात्री संवाद साधला. यावेळी त्यांनी आमच्याकडून अनेक पुरावे सादर करण्यात आले पण समोरुन बनावट प्रतिज्ञापत्रं सादर करण्यात आल्याचा दावा केला. “आम्ही प्रतिज्ञापत्रं सादर केली. बहुमताची आकडेवारी सादर केली. मात्र समोरुन काहीच झालं नाही. झाली तीही बोगस कागदपत्रं सादर झाली. मुंबई पोलिसांनी ही बोगस प्रतिज्ञापत्र ताब्यात घेतली आहेत. नोटरी काही फरार आहेत. गुन्हे शाखेकडे हे प्रकरण वर्ग केलं आहे. हे मोठं रॅकेट आहे. नक्की यामध्ये सगळं समोर येईल,” असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

यानंतर पत्रकारांनी, येणाऱ्या काळात धनुष्यबाणावर दावा करणार का? असा प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारला. यावर मुख्यमंत्र्यांनी, “आमचा दावा पेंडींग आहे. ऑन मेरीट आमचा दावा पेंडींग आहे. इतर जे निर्णय निवडणूक आयोगाने घेतले आहेत. तसेच हे प्रकरण आहे. आमच्याकडे ७० टक्के बहुमत आहे. संस्थांत्मक संख्याबळही आमच्याकडे अधिक आहे,” असं उत्तर दिलं. तसेच, “इतर राज्यातील लोक आमच्याकडे आहे. त्यामुळे मेरीटवर त्यांना (निवडणूक आयोगाला) धनुष्यबाण आम्हालाच द्यावा लागेल,” असंही शिंदे यांनी म्हटलं.